आजपासून पुण्यात कुस्तीचा थरार! लाल मातीत घुमणार शड्डुचा आवाज

पुणे : महाराष्ट्रातील कुस्तीपटूंना आपली धमक दाखवण्यासाठी उत्तम व्यासपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला उद्यापासून पुण्यातील कोथरूड येथे सुरुवात होणार आहे.माती व गादी या दोन विभागांत खेळवण्यात येणाऱ्या स्पर्धेमध्ये ४५ जिल्हे व शहर यांच्यामधील जवळपास ९०० कुस्तीपटू जेतेपद पटकावण्यासाठी सर्वस्व पणाला लावणार आहेत. भव्यदिव्य स्पर्धेमध्ये १० कोटींच्या बक्षिसाचा वर्षावही करण्यात आला आहे. गतविजेता कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील याच्यासह नावाजलेल्या कुस्तीपटूंच्या सहभागामुळे स्पर्धा ऐतिहासिक ठरेल अशी चिन्हे निर्माण झाली आहेत.



महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची अस्थायी समिती व संस्कृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने उद्यापासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेच्या जेतेपदाचा फैसला १४ जानेवारीला होणार आहे. या स्पर्धेसाठी गादी विभागासाठी तीन व माती विभागासाठी दोन मैदाने तयार करण्यात आली आहेत. कुस्तीच्या मैदानात १५ ते २० एलईडीही लावण्यात आले आहेत. तब्बल ७० हजार कुस्तीप्रेमी बसून लढतीचा आनंद घेऊ शकतील, अशी उत्तम व्यवस्थाही करण्यात आली आहे.

पुरस्कारांचा वर्षाव

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये पुरस्कारांचा वर्षाव करण्यात आला आहे. महाराष्ट्र केसरी विजेत्या मल्लाला १४ लाखांची महिंद्रा थार जीप देण्यात येणार असून पाच लाखांच्या बक्षिसाचाही तो मानकरी ठरणार आहे. उपविजेत्या खेळाडूला महिंद्रा ट्रॅक्टर व अडीच लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

पृथ्वीराज प्रबळ दावेदार

मागील वर्षी सातारा येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटील याने ही स्पर्धा जिंकण्याची किमया साधली होती. सोलापूरच्या विशाल बनकरवर मात करीत त्याने गदा पटकावली होती. यंदाही पृथ्वीराज पाटील याच्याकडेच प्रबळ दावेदार म्हणून बघितले जात आहे. पुण्याचा हर्षद कोकाटे हा पृथ्वीराज याला कडवी झुंज देऊ शकतो, असे मत कुस्ती जाणकारांकडून व्यक्त करण्यात आले आहे.

हे खेळाडूही शर्यतीत

पृथ्वीराज पाटील व हर्षद कोकाटे यांच्यासह आणखी काही कुस्तीपटूंच्या खेळावर नजरा खिळल्या आहेत. सोलापूरचा माउली जमदाडे, मुंबई उपनगरचा प्रकाश बनकर, वाशीमचा सिकंदर शेख, साताऱ्याचा किरण भगत, मुंबईचा आदर्श गुंड, सोलापूरचा विशाल बनकर या खेळाडूंमध्येही जिंकण्याची क्षमता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने