मुलांच्या शिक्षणासाठी एकेकाळी आई वडिलांनी फोडल्या विहीरी-बारवा; मुलगा आज पोलीस उपायुक्त

सोलापूर : मुलाच्या शिक्षणासाठी आई वडिलांनी काबाडकष्ट करत विहीरी-बारवा फोडल्या. त्यांच्या कष्टाचे मुलाने देखील चीज केले असून, पुणे जिल्ह्यातील पिंपळे धुमाळ येथील रमेश धुमाळ यांनी हलाखीची परिस्थितीमुळे अकरावीतुनच खाजगी कंपनीत नोकरी करत उर्वरित संपूर्ण शिक्षण कला शाखेतून बहिस्थ मार्गाने पुर्ण करीत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला अन् जिद्द व चिकाटीने राज्यात प्रथम क्रमांकाने पोलीस उपनिरीक्षक व राज्यसेवेच्या तिसऱ्या प्रयत्नात पोलीस उपअधीक्षकपद पदाला गवसणी घातली आहे. त्यांची हि प्रेरणादायी यशोगाथा.पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ आपल्या यशाबद्दल सांगतात की, पिंपळे धुमाळ म्हणजे दोन ते अडीच हजार लोकसंख्या असलेले दुष्काळी पट्ट्यातील गाव. बेभरवशाच्या पावसावर शेती अवलंबून होती. त्यात आम्हाला अडीच एकरच शेतीचे क्षेत्र. वर्षातून एखादे पीक जरी पिकलं तरी नशीब समजलं जायचं. आई वडील दोघेही फारसे काही शिकलेले नव्हते. परंतु आपल्या मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे यासाठी त्यांची धडपड असायची.



शेती असुन नसल्यासारखी असल्याने, आई वडील दोघेही विहिर फोडण्याच्या कामासाठी व पाटाच्या कामासाठी जात असत. अत्यंत कष्टाचे असलेले हे काम आई, वडिलांच्या खांद्याला खांदा लावून करत होती. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने कामाच्या आलेल्या पैशातून संसाराचा गाडा हाकत आई वडील काटकसर करत. त्यातूनच शिक्षणासाठी पैसे देत असत. आपण शिकलो तरच घरची परिस्थिती बदलेल याची जाणीव असल्याने व आई वडिलांच्या कष्टाची प्रेरणा घेऊन, मी स्वतः ला सिध्द करण्यासाठी प्रयत्न करत होतो. पहिलीपासून वर्गात नेहमी अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण होत असायचो.प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत झाल्यानंतर माध्यमिक शिक्षण पिंपळे व हिवरे या दोन गावच्या सिमारेषेवर असलेल्या जीवन विकास विद्यालमध्ये झाले. तेथे अभ्यासामध्ये प्रचंड स्पर्धा होती. परंतु अभ्यासातील हुशारीच्या आणि जिद्दीच्या जोरावर तेथे देखील प्रथम क्रमांक कधीच सोडला नाही. शिक्षणातील प्रगती बघता आई वडिलांची मी शिक्षक व्हावे अशी इच्छा होती. परंतु कालांतराने परिस्थितीनुसार निर्णय बदलत गेले. दहावीनंतर मेडिकल किंवा इंजिनिअरिंगचा शैक्षणिक गुणवत्ता असताना देखीलआार्थिक परिस्थिती नसल्यामुळे विचार सोडुन द्यावा लागला. पुढे अकरावीला विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. हे शिक्षण घेत असतानाच टेल्को या नामांकित कंपनीत भरती निघाली होती.

नोकरी करत कुटुंबाला हातभार लावत शिक्षण करावे या हेतूने ती परिक्षा दिली अन् निवड झाली. त्यामुळे तात्काळ ती नोकरी स्वीकारली. कंपनीच्या माध्यमातून वेगवेगळ्या ट्रेडचे आयटीआयचे शिक्षण दिले जायचे. त्यातून शिक्षण घेत चांगले काम करू लागलो. पण शिक्षण अर्धवट राहिल्याची खंत मनात कायम होती. त्यामुळे नोकरी करत बहिस्थ शिक्षण घेत बारावी करावी या हेतूने वाणिज्य शाखेला ला प्रवेश घेतला. मला स्पर्धा परीक्षेची आवड असल्याने, गावातील शिक्षक भविष्यातील ध्येयाबद्दल विचारपूस करत असत.नोकरी करत शिक्षण घेत असल्याने त्यांनी स्पर्धा परीक्षेसाठी सोईस्कर होईल यासाठी त्यांनी कला शाखेमधुन शिक्षण घेण्याचा सल्ला दिला. परंतु पुर्णवेळ शिक्षणासाठी देता येत नसल्याने, पदवीला बहिस्थ मार्गाने कला शाखेमध्ये प्रवेश घेतला. परिक्षेपुरते शाळेत उपस्थिती असुन देखील तेथेही अव्वल स्थान कायम राखले होते.

कंपनीतील कामाबरोबर शिक्षण व त्याबरोबरीनेच स्पर्धा परीक्षेची स्वप्ने रंगवत होतो. कंपनीच्या पगारात फक्त घर चालत होते. भविष्य काही दिसत नव्हते. कंपनीमध्ये कायमस्वरूपी नोकरीची देखील काही चिन्हे नव्हती. त्यामुळे नैराश्य, ताणतणाव येऊ लागला. दुसऱ्या एका कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळाली ती स्वीकारली पण जसे पदवीचे शिक्षण पूर्ण झाले तसे त्या वयात खाकी वर्दीचे आकर्षण वाटू लागले.त्यामुळे अभ्यासावर लक्ष केंद्रित करून पोलीस उपनिरीक्षक पदाची परिक्षा दिली. पहिल्याच प्रयत्नात अवघ्या दहा मार्कांनी मुख्य परीक्षेत अपयश आले. त्यामुळे आत्मविश्वास चांगलाच वाढला. पूर्ण वेळ स्पर्धा परिक्षेचा अभ्यास केला तर यश् नक्की मिळेल असा विचार करुन नोकरीचा राजीनामा दिला. याबाबत आई वडिलांना कल्पना दिली. त्यांनी देखील पाठिंबा दिला. रात्र दिवस एक करत काम करून त्यांनी पैसे पुरवले. त्याचबरोबर गावातील काही मित्रांनीही आर्थिक मदत केली. स्पर्धा परीक्षेच्या वातावरणात आल्यानंतर जाहिरात निघेल ती परिक्षा द्यायची या हेतूने झपाट्याने अभ्यास सुरू केला.

पोलीस उपनिरीक्षक व राज्यसेवेची मुख्य परीक्षा लागोपाठ असल्याने, चिकाटीने दोन्ही परिक्षेत यश संपादन करायचे या हेतूने अभ्यास केला. दुसऱ्या प्रयत्नात पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परिक्षेत राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालो. पोलीस उपनिरीक्षक झाल्यानंतर गावातुन भव्य मिरवणूक काढण्यात आली होती त्यामुळे भारावून गेलो होतो. त्यानंतर तीनच महिन्यामध्ये विवाह झाला. पोलीस उपनिरीक्ष्क पदावर प्रथम क्रमांकाने निवड झाल्यामुळे आपल्यात यापेक्षा मोठे पद मिळविण्याची क्षमता असुन, प्रयत्न करणे गरजेचे आहे हे ओळखून अभ्यासात सातत्य ठेवले. शिक्ष्कांचे मार्गदर्शन,आई वडिलांचे कष्ट, पत्नीचा व बहिणीचा भक्क्म पाठिंबा यामुळे राज्यसेवेच्या दुसऱ्या प्रयत्नात लगेच नायब तहसीलदारपदी निवड झाली. त्यामुळे पोलीस उपअधीक्षक हे अंतिम ध्येय ठेवून अभ्यास सुरू ठेवला व अखेर तिसऱ्या प्रयत्नात पोलीस उपअधीक्षकपदी निवड झाली. याकाळात आर्थिक परिस्थितीमुळे अनंत अडचणी निर्माण झाल्या परंतु त्यावर मात करत जिद्द व चिकाटीने यश संपादन केले.बहिस्थ मार्गाने कला शाखेमधुन शिक्षण घेऊन अधिकारी झाल्याने सर्वत्र कौतुकाचा वर्षाव झाला. मी गावातून अधिकारी झालेलो पहिला व्यक्ती होतो. आज अधिकाऱ्यांची गाव म्हणून गावची ओळख निर्माण झाली आहे.सध्या पदोन्नतीने पोलीस महासंचालक कार्यालयात पोलीस उपायुक्त या पदावर कार्यरत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने