कलर्स मराठीचं प्रेक्षकांना न्यू इयर गिफ्ट.. दोन नव्या मालिका भेटीला..

मुंबई:  कलर्स मराठी वाहिनी सध्या जोरदार घोडदौड करत आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने या वाहिनीने दोन नव्या मालिका प्रेक्षकांसाठी आणल्या आहेत. त्यामुळे प्रेक्षकांसाठी चांगलीच पर्वणी असणार आहे. लवकरच दोन वेगळ्या धाटणीच्या प्रेमकथा छोट्या पडद्यावर येणार आहेत.असं म्हणतात एकमेकांचा तिरस्कार करणारी, भिन्न स्वभावाची आणि भिन्न विचारसरणीची दोन माणसं कधीही एकत्र येऊ शकत नाहीत. किंवा पहिल्या नजरेत आपल्याला जशी एखादी व्यक्ती दिसते ती तशी असेलच असं काही सांगता येत नाही. अगदी तसंच होणार आहे सावी आणि रमाच... कलर्स मराठी घेऊन येत आहे अश्या दोन नायिकांची कथा ज्यांचे स्वभाव, राहणीमान आणि विचार अतिशय वेगळे आहेत. एक मनमोकळी आहे तर एक बेधडक एक जरा उद्धट आहे तर एक स्पष्टवक्ती. दोघींचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि व्याख्या वेगळी आहे. जेव्हा या मुलींच्या आयुष्यात त्यांच्याहून वेगळ्या स्वभावाच्या दोन व्यक्ती येतील तेव्हा त्यांचं आयुष्य किती बदलेल ? हे या मालिकांमधून उलगडणार आहे.




'पिरतीचा वनवा उरी पेटला' चिन्मय मांडलेकर यांनी लिहिलेल्या या कथेची निर्मिती पोतडी प्रॉडक्शन्सने केली असून सावीची भूमिका रसिका वखारकर आणि अर्जुनची भूमिका इंद्रनील कामत साकारणार आहेत. रामा राघव रोहिणी निनावे लिखित मालिकेची निर्मिती क्रिएटिव्ह ट्रान्समीडिया यांनी केली आहे. अभिनेत्री ऐश्वर्या शेटेचा तिखट अंदाज तर अभिनेता निखिल दामलेचा प्रसन्न गोडवा यामुळे खट्याळ प्रेमाची ही ‘तिखटगोड’ गोष्ट पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.पैजेवर जग जिंकणारी 'रमा' आणि प्रेमाने जग आपलेसे करणारा 'राघव' यांची खट्याळ जोडी कलर्स मराठीवरच्या ‘रमा राघव’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. दोन अतिशय विरुद्ध कौटुंबिक वातावरणातून आलेल्या रमा आणि राघव यांच्यातील संघर्षाची आणि त्यातून पुढे फुलणाऱ्या प्रेमाची ही तिखट गोड गोष्ट आहे. संस्कार ,संस्कृती, परिश्रम याशिवाय आयुष्यात काही मिळत नसतं याची शिकवण अंगी भिनलेला राघव तर पैशांनी काहीही विकत घेता येतं आणि अशक्य असे काही नसते असा विचार करणारी, अहंकारी रमा यांचा सामना होतो..आणि या भांडणातूनच प्रेम फुलायला लागतं. आयुष्यात आदर्श, तत्व, मूल्य यांचं महत्व नवीन पिढीला हलक्या फुलक्या रीतिने पटवून देण्याचा प्रयत्न या मालिकेद्वारे केला जाणार आहे.

“पिरतीचा वनवा उरी पेटला” मालिकेतील आपली सावी आत्ताच्या पिढीतील मनमोकळी अशी मुलगी आहे. सावी जरी चोरी करत असली तरीदेखील आपल्याकडून कुठल्याही चांगल्या आणि गरीब माणसाला लुटलं जाऊ नाही असं तिचं सूत्र आहे. ज्या शाळेसाठी तिनं आयुष्यात पहिल्यांदा चोरी केली ती शाळा आपल्या पायावर उभी राहावी अशी तिची इच्छा आहे. सावीचे आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे या गोष्टीशी अनभिज्ञ सावी कवठेभैरव गावात येते. आणि तिथे तिची भेट अर्जुनशी होते. अर्जुन गावातील मोठं प्रस्थ आहे असं म्हणायला हरकत नाही. अर्जुन अतिशय तिरसट, संयमी, धोरणी पण तापट, दिलदार पण खुनशी आहे. तो त्या गावातला एक कर्तबगार तरुण आहे. त्याने घर, व्यवसाय आणि घरातला कारभार सांभाळला आणि सगळ्यांना आपल्या टाचेखाली आणलं. आता जेव्हा सावी आणि अर्जुन भेटतील तेव्हा यांच्या प्रेमकथेचा करार कसा रंगेल ? लग्नाच्या नात्यात अडकून कोणाला फसवणं सावीला मान्य नाही आणि लग्न या बंधनावर अर्जुनचा विश्वास नाही. पण असं काय घडतं कि कि दोघे एक बंधनात अडकतात ? असं कुठलं सत्य आहे जे अजून सावीला माहिती नाहीये ? हळूहळू सगळ्याचा उलघडा होईलच.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने