...अन् इथूनच लागलं पं. भीमसेन जोशी यांना गायनाचं वेड

मुंबई: गायन क्षेत्रातलं गाजलेलं नाव अन् किती गायनाचं प्रेमवेड असणारे पंडित भीमसेन जोशी.त्यांच्या गायकीला तोज नव्हतीच. आज त्यांची पुण्यतिथी. त्यांचे तुम्ही कधीही न ऐकलेले किस्से जाणून घेऊयात.भारतरत्न पं. भीमसेनजी (भीमण्णा) यांच्याविषयी आपण बरंच वाचलेलं आणि ऐकलेलं आहे. त्यांच्यावर बरीच पुस्तकंही प्रसिद्ध झालीत. उपलब्ध माहितीनुसार त्यांचं संपूर्ण नाव भीमसेन गुरुराज जोशी, जन्म १९२२ सालच्या रथसप्तमीचा.कर्नाटकातल्या गदग गावातला. तिथी रथसप्तमीची असली तरी ते आपला वाढदिवस ४ फेब्रुवारीला साजरा करायचे, हे आपणांस माहीतच आहे. त्यांचे वडील गुरुराजजी हे एक व्यासंगी संस्कृत भाषिक विद्वान होते.

सरकार दरबारी मानमरातब होता. त्यांच्या अकरा मुलांपैकी सर्वात ज्येष्ठ. ते आपले पं. भीमसेनजी. त्यांच्या आईच्या गळ्यातून ऐकायला मिळालेली कानडी भजने हा भीमसेनजींच्या बाल-गळ्यावर झालेला पहिला संस्कार.गाण्याची आवड ही इथेच निर्माण झाली. घरात भावंडांचा गोतावळा असल्याने भीमसेनजी त्यांच्यापासून थोडंसं अलिप्त राहून घराजवळच्या ग्रामोफोनच्या रेकॉर्डस्‌ विकणाऱ्याच्या दुकानात तासन्‌तास बसत असत.हा दुकानदार नवीन रेकॉर्ड आली की ती सतत जाहिरातीसारखी वाजवायचा. गाणं हेच आपलं जीवन, संगीत हाच आपला श्‍वास आहे; आपल्याला आता त्याचीच गोडी लागलीय हे त्यांना बालवयात उमगलं.अनेक दिग्गजांनी गायलेली गाणी तबकडीवर ऐकत तोंडपाठ करून ती पुन्हा पुन्हा गायचा सपाटाच लावला. परिचितात कौतुक होऊ लागलं.



इथूनच पंडित भीमसेन जोशींना लागलं गायनाचं वेड

१९३२ साली उस्ताद अब्दुल करीम खाँसाहेबांची ‘पिया बिन आवत नाही चैन..’ ही ‘झिझोटी’ रागातली ठुमरी ऐकली आणि त्यांच्या गायकीने भीमसेनजींना अक्षरशःवेड लावलं. आपल्या या मुलाचं मन संगीतात रमतंय हे बाबांच्या लक्षात आलं.बाबांनी हार्मोनियम आणून दिला. त्यांनी गावातल्याच एका जन्नप्पा (की चन्नप्पा) कुर्तकोटीबुवांकडे त्याला धाडलं. त्यांच्याकडे काहीबाही शिकेल असं वाटलेलं खरं पण भीमसेनजींच्या मनात वेगळंच होतं. त्यांचं मन तिथे रमेना.आपल्या गळ्यात उस्ताद अब्दुल करीम खाँ वगैरे दिग्गजांसारखं गाणं यायला हवं असा ध्यास होता. त्याच वेडानं झपाटलं होतं. एके दिवशी घरात काहीतरी कारण सांगून स्वारी पळून गेली, थेट उत्तरेकडे.

विजापूर ते पुणे आणि पुढे ग्वाल्हेर, कधी उपाशी, तर कधी अर्धपोटी असा खडतर प्रवास. त्या काळात ग्वाल्हेर हे ठिकाण संगीत आणि कलेचं माहेरघर म्हणून ओळखलं जायचं. खिशात छदाम नाही, पाठीवर शिदोरी कसली तर रेकॉर्डस्‌ ऐकून पाठ केलेल्या तोडक्या-मोडक्या बंदिशी.ग्वाल्हेर महाराजांच्या संगीत विद्यालयात कार्यरत असणाऱ्या उस्ताद हफीज अली खाँसाहेब (विख्यात सरोदवादक उस्ताद अमजदअली खाँसाहेबांचे वडील) यांच्या मेहरबानीने एका ठिकाणी खाण्याची सोय झाली, पण गाण्याचं काय? शेवटी उस्ताद गंजड खाँसाहेबांच्या घरात गुरुकुल पद्धतीनं शिकताना त्यांच्या घरात राबराब राबून थोडी विद्या हासिल केली.नंतर खडगपूर येथल्या केशवराव लुखे, विश्‍वदेव चटर्जी, तसेच न्यू थिएटर्सचे पहाडी संन्याल यांच्याही सान्निध्यात संगीताचे धडे गिरवले. काहीही केल्या एकाग्रता येईना. मन रमेना. या गुरूंच्या व्यस्त दिनचर्येमुळे साधनेत खंडही पडू लागला होता.जालंदरमध्ये ‘हरी वल्लभका मेला’नामक संगीत संमेलन व्हायचं. नामांकित गायकांची मांदियाळी भरायची. आपली सांगीतिक तृष्णा भागविण्यासाठी देशभरातून लोक तिथे हजेरी लावायचे.

भीमसेनजी तानपुरा घेऊन काहींची साथसंगत करायचे. याच संगीत संमेलनात त्यांची गाठ पडली ती पं. विनायकबुवा पटवर्धनजींशी. त्यांनी भीमसेनजींची आस्थेनं विचारपूस केली. तो गाणं शिकायला दूर जालंदरला आलेला पाहून बुचकळ्यात पडले. ‘गाणं शिकायला तू इतक्या दूरवर आलायस? अरे तुझ्या गावाजवळंच कुंदगोळला संगीतातली एक महान व्यक्ती राहते. उस्ताद अब्दुल करीम खाँसाहेबांचेच शिष्य  आहेत ते.सवाई गंधर्व त्यांचं नाव. त्यांच्याकडेच जा तू..’ भीमसेनजी त्यांच्याकडे पाहतच राहिले. ‘काखेत कळसा आणि गावाला वळसा’ म्हणतात ना तसंच वाटलं भीमसेनजींना.पंडित भीमसेन जोशी यांचे बरेच किस्से लोकांना माहिती नाही. त्यांना गायनाची मनापासून आवड होती. त्यांच्या तालात श्रोतेही हरपून जायचे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने