‘अल्फाबेट’ १२ हजार कर्मचारी कमी करणार

कॅलिफोर्निया : गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटनेही १२ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची घोषणा केली आहे. ही संख्या कंपनीच्या एकूण जागतिक मनुष्यबळाच्या सहा टक्के इतकी आहे. वाढती महागाई आणि अस्थिर जागतिक अर्थव्यवस्था यामुळे गेल्या काही महिन्यांपासून विविध कंपन्यांनी कर्मचारी कपातीची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. त्या यादीत आता जगातील दिग्गज आयटी कंपनी अल्फाबेटची भर पडली आहे.कंपनीच्या जगभरातील कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम होईल. या निर्णयाची संपूर्ण जबाबदारी त्यांची आहे, असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे.



गुगलची प्रतिस्पर्धी मायक्रोसॉफ्टने १० हजार कर्मचारी कमी करण्याची घोषणा केल्यानंतर काही दिवसातच अल्फाबेटनेही हेच अस्त्र उगारल्याने तंत्रज्ञान क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.गुगल आणि मायक्रोसॉफ्ट जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअरच्या नव्या क्षेत्रात गुंतवणूक करत आहेत. आमची उत्पादने, सेवा यांचे मूल्य आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समधील गुंतवणूक यामुळे कंपनीला अनेक संधी उपलब्ध होतील, असे पिचाई यांनी म्हटले आहे.

तुमचे योगदान अमूल्य ः पिचाई

अमेरिकेतील ज्या कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागणार आहे, त्यांना आम्ही आधीच एक वेगळा ईमेल पाठवला आहे. इतर देशांमध्ये, स्थानिक कायदे आणि पद्धतींमुळे या प्रक्रियेला थोडा अधिक वेळ लागेल. या निर्णयामुळे काही प्रतिभावान लोकांचा निरोप घ्यावा लागणार आहे, ज्यांना कामावर ठेवण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले आणि त्यांच्यासोबत काम करणेही आम्हाला आवडते. त्याबद्दल मला मनापासून खेद वाटतो.हे बदल या कर्मचाऱ्यांच्या जीवनावर खूप मोठा परिणाम करतील याची मला जाणीव आहे. मी या निर्णयांची संपूर्ण जबाबदारी घेतो. आर्थिक प्रगतीसाठी आम्हाला कठोर निर्णय घ्यावे लागतील. त्यामुळे, आम्ही उत्पादन क्षेत्र आणि कामकाजाचे कठोर पुनरावलोकन केले असून, आमची भूमिका कंपनी म्हणून आमच्या सर्वोच्च प्राधान्यांशी जुळते याची खात्री केली आहे.त्यानुसार उत्पादन, कार्ये आणि विविध विभागातील नोकऱ्या आम्ही कमी केल्या आहेत. कंपनीच्या प्रगतीसाठी कठोर परिश्रम केल्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांना अनेक धन्यवाद. तुमचे योगदान अमूल्य आहे आणि आम्ही तुमचे आभारी आहोत. हे संक्रमण सोपे नाही, त्यामुळे आम्ही कर्मचाऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार आहोत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने