छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक की धर्मवीर?, अमोल कोल्हेंनी मांडली भूमिका; म्हणाले…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटत आहेत. यावरून भाजपा आणि शिंदे गट अजित पवारांविरोधात आक्रमक झाला आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी अजित पवारांच्या विधानावरून आंदोलनही करण्यात येत आहेत. याप्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

काय म्हणाले होते अजित पवार?

हिवाळी अधिवेशनात विधानसभेत बोलताना अजित पवारांनी म्हटलं की, “आपण छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख स्वराज्यरक्षक असा करतो. पण, त्यांना काही लोक धर्मवीर म्हणत आहेत. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते. संभाजी महाराजांनी कधीही धर्माचा पुरस्कार केला नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनीही हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती,” असं अजित पवार म्हणाले होते.



यावर अमोल कोल्हे यांनी एक व्हिडीओ शेअर करत छत्रपती संभाजी महाराज स्वराज्यरक्षक होते की धर्मवीर यावर भाष्य केलं आहे. “औंरगाजेबने आदिलशाही, कुतूबशाही नेस्तानाबूत केली. स्वत:च्या बापाला आणि सख्ख्या भावांची कत्तल केली. त्यामुळे धर्मयुद्धा असण्यापेक्षा ही सत्तावर्चस्वाची लढाई होती. काबूल ते बंगाल सत्ता असलेल्या औरंगाजेबला ८ वर्ष दख्खनमध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी फरफटवलं होतं. त्यामुळे हे धर्मयुद्ध होत नाही. पण, संभाजी महाराजांना धर्मवीर ही बिरुदावली लावली, तर शेवटचे दिवस म्हणजे कैद केल्यापासून बलिदानाच्या काळापर्यंत त्यांना मर्यादित ठेवते,” असं अमोल कोल्हेंनी म्हटलं आहे.

“त्यापेक्षा स्वराज्यरक्षक ही बिरुदावली खूप जास्त व्यापक ठरते. कारण, संभाजी महाराजांनी ९ व्या वर्षापासून स्वराज्यासाठी त्याग केला. शिवाजी महाराजांच्या निधानंतर पाच आघाड्यांवर मात करत संभाजी महाराजांनी स्वराज्य राखलं. त्यामुळे केवळ धर्म म्हणण्यापेक्षा तत्कालीन इतिहासाचा विचार केला तर देव, देश आणि धर्म या तिनही गोष्टींचा परिपाक होता, तो म्हणजे स्वराज्य,” असं मत अमोल कोल्हेंनी मांडलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने