राज्याला आणखी एक धक्का; उद्योगांपाठोपाठ आता प्राणीदेखील गुजरातला रवाना

 मुंबई: राज्यातील हत्तींपाठोपाठ आता वाघ आणि बिबट्यांनाही गुजरातमध्ये पाठविण्यात येत आहे. यावरुन केंद्र सरकारचे गुजरात प्रेम पुन्हा अधोरेखित झालेले आहे. गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमधील चार वाघ आणि चार बिबटे शनिवारी गुजरातला रवाना झाले.वाघ आणि बिबटे मिळावे म्हणून दोन ते तीन वर्षापासून केंद्रीय प्राणिसंग्रहालयाला अर्ज केलेल्या देशातील दहा ते अकरा प्राणिसंग्रहालयांना हिरवा झेंडा न दाखविता आठच दिवसांत गुजरातला हे प्राणी देऊन त्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचे बोलले जात आहे.



काही दिवसांपूर्वी गोरेवाडा प्रकल्पातून दोन वाघ संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नेण्यात आले. मात्र, हे वाघ नेताना गुजरातमधील जामनगरमधील एका मोठ्या उद्योगपतीच्या खासगी प्राणिसंग्रहालयातील काही अधिकारी गोरेवाडा प्रकल्पात आले होते.त्यांनी गोरेवाडा प्रशासनाच्या रेस्क्यू सेंटरकडे केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाची परवानगी नसताना जामनगर येथील पशुवैद्यकीय वाघ, बिबट्यांची मागणी केली होती. मात्र, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), राज्य सरकार आणि केंद्रीय प्राणिसंग्रहालयाची परवानगी नसल्याने त्यांनी वन्यप्राणी देण्यास नकार दिला होता.जामनगर येथील अधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठांना तसा निरोप दिला. त्यानंतर, केंद्र सरकारकडून सूत्रे हलताच तीनच दिवसांत केंद्रीय प्राणिसंग्रहालयासह राज्य शासन, प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्या परवानग्या गोरेवाडा प्रशासनाला देण्यात आल्या.कायद्याच्या चौकटीत राहून गोरेवाडा प्रशासनाने वन्यप्राणी देण्यास होकार दिला. दोन दिवसांपूर्वी चार वाघ आणि चार बिबटे गुजरातकडे रवाना झाले.

वन्यप्रेमींची नाराजी

तब्बल दोन ते तीन वर्षापासून प्रलंबित असलेल्या इतर राज्यांच्या अर्जांना केराची टोपली दाखविली. तीनच दिवसांत गुजरातमधील जामनगरच्या पारड्यात गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाने वजन टाकल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. या प्रकारावर वन्यजीव प्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.राज्यातून मागील काही महिन्यांपूर्वी वेदांता फॉक्सकॉन प्रकरणावरुन विरोधकांनी शिंदे सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं. त्यानंतर ही आता हे प्राणी राज्यातून गुजरातला गेले आहेत. त्यामुळे विरोधक पुन्हा आक्रमक होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने