रंकाळा तलावाजवळ म्हशींची वेगळी व्यवस्था

कोल्हापूर : रंकाळा तलावात म्हशी धुण्याचे होत असलेले प्रदूषण रोखण्यासाठी जुन्या वाशी नाक्याजवळ म्हशींसाठी वेगळी व्यवस्था केली जात आहे. पदपथासाठी बांधलेल्या पुलाजवळ रंकाळ्यातील पाणी घेण्याबरोबरच अस्वच्छ पाणी ड्रेनेज लाईनमधून बाहेर काढण्याचे काम केले जात आहे. त्यातून म्हशींसाठी रंकाळ्यातील पाणी स्वतंत्ररीत्या वापरता येणार असून, त्यातून तलावाचे प्रदूषणही होणार नाही, असे महापालिकेचे नियोजन आहे.जुना वाशी नाक्याजवळ पदपथासाठी बांधलेल्या पुलाखाली तात्पुरता बांध घातला आहे. सरनाईक कॉलनी परिसरातून येणारा नाला ओसंडून वाहिल्यास ते सांडपाणी रंकाळ्यात जाऊ नये म्हणून ही दक्षता घेतली आहे. हाच परिसर म्हशींसाठी राखीव करण्याच्या उद्देशाने महापालिकेने निर्णय घेतला आहे. तलावात दररोज म्हशी धुतल्या जातात. त्यांना रोखण्यासाठी या पुलाजवळील भागातच त्या धुतल्या जाव्यात अशी व्यवस्था केली जात आहे.



सध्या तिथे ओसंडलेले सांडपाणी अडवले आहे. जलपर्णीही आहे. हा भाग साफ केला जाणार आहे. तसेच पुलाखाली तलावातील पाणी आत घेण्यासाठी व्हॉल्वचे नियोजन केले जाणार आहे. ज्यावेळी तलावातील पाणी लागेल, त्यावेळी व्हॉल्व सोडून पाणी घेण्यात येणार आहे. तसेच घेतलेले पाणी खराब झाल्यानंतर रस्त्यावर असलेल्या ड्रेनेज लाईनमधून बाहेर काढले जाणार आहे.त्यामुळे खराब पाण्याने तलावाचे प्रदूषण होणार नाही. सध्या तेथील खराब पाणी काढण्यासाठीच्या पाईप ड्रेनेज लाईनला जोडण्याचे काम सुरू आहे. त्या भागात भुयारी पाईप टाकल्या जाणार आहेत. पुलाखाली व्हॉल्व बसवण्याचे कामही केले जाणार आहे. यामुळे म्हशी रंकाळ्यात न नेता त्या पाण्यात धुण्याची म्हशीवाल्यांची व्यवस्था होणार आहे. तसेच त्यातून तलावाचे होणारे प्रदूषणही रोखता येणार आहे.

स्वच्छता न केल्यास खर्च ‘पाण्यात’ सरनाईक कॉलनीतून येणारा नाला ओसंडून वाहतो व ते पाणी रंकाळ्यात मिसळू नये म्हणून पुलाखाली बांध घातला आहे. हा नाला ड्रेनेज लाईनला जोडलेला आहे. पण, त्यातून वाहून येणारा कचरा रोखण्यासाठी जाळ्या लावल्या आहेत. हा कचरा काढला गेला नाही की पाणी अडून ओसंडून तलावाकडे जाते.हे प्रकार रोखण्यासाठी कचरा नियमित काढण्यासाठी यंत्रणा नेमण्याची गरज आहे. या यंत्रणेकडून काम झाले नाही तर १५ लाख रुपये खर्च करून केल्या जाणाऱ्या योजनेत सांडपाणी मिसळणार व म्हशी त्यात धुता येणार नाहीत. त्यामुळे या कामात फार दक्षता आवश्‍यक आहे.या कामासाठी नावीन्यपूर्ण योजनेतून १५ लाखांचे नियोजन केले आहे. तलावातील पाणी घेण्याबरोबरच अस्वच्छ झालेले पाणी ड्रेनेज लाईनमधून सोडले जाईल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने