विधानसभा मतदारयादीही केवळ कन्नडमध्येच

बेळगाव : जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांची अंतिम मतदारयादी या वेळीही केवळ कन्नड भाषेतच तयार करण्यात आली आहे. मराठी मतदारयाद्यांची छपाई अद्याप झालेली नाही, त्यामुळे मराठी मतदारयाद्या मिळण्यास विलंब लागेल,असे महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे बेळगाव दक्षिण, उत्तर व ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मराठी भाषिकांना त्यांचे नाव मतदारयादीत आहे की नाही? हे शोधण्यासाठी विलंब लागणार आहे.सप्टेंबर २०२१ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीवेळीही अशीच समस्या उद्‍भवली होती. त्यावेळीही मनपाच्या निवडणूक विभागाकडून केवळ कन्नड भाषेतील मतदारयादी तयार केली होती. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने महापालिकेत जावून मराठी भाषेतील मतदारयादी देण्याची मागणी केली.‘सकाळ’ने त्यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर मराठी भाषेतील मतदारयादी दिली, पण त्यात अनेक त्रुटी होत्या. शिवाय मतदारयादी विलंबाने मिळाल्याने उमेदवार व मतदारांना त्यांचे नाव शोधण्यात अडचण आली. अनेकांची नावे गायब झाली होती, त्यामुळे अनेकांना मतदानही करता आले नाही.

त्याची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठी भाषिकांनी आतापासूनच मराठी मतदारयादीसाठी पाठपुरावा करण्याची गरज आहे.जिल्ह्यातील खानापूर, बेळगाव दक्षिण, उत्तर व ग्रामीण, यमकनमर्डी, हुक्केरी, निपाणी, चिक्कोडी, रायबाग, कागवाड, अथणी, गोकाक या मतदारसंघात मराठी भाषिक आहेत.खानापूर, बेळगाव दक्षिण, उत्तर व ग्रामीण तसेच निपाणी हे मतदारसंघ तर मराठी बहुल आहेत. स्थानिक भाषेत मतदारयादी देण्याबाबतची केंद्रीय निवडणूक आयोगाची सूचना आहे, पण त्याकडे जिल्ह्यातील निवडणूक विभागाकडून नेहमीच दुर्लक्ष केले जाते. निवडणूक मग ती कोणतीही असो मराठी मतदारयादी मिळविण्यासाठी मराठी भाषिकांना संघर्ष करावाच लागतो.




मराठी मतदारयादी उपलब्ध करून देण्यासाठी विद्यमान आमदारांकडून प्रयत्न व्हायला हवेत, पण त्यांच्याकडूनही पाठपुरावा होत नाही. त्यांना मराठी मतदार हवेत, पण मराठी मतदारयादी नको, अशीच स्थिती पहावयास मिळते.निवडणूक विभागाकडून जेव्हा प्रारूप मतदारयादी जाहीर केली जाते, त्यावेळीच मराठीची मागणी व्हायला हवी. पण प्रारूप मतदारयादीबाबत मराठी मतदार फारसे गंभीर नसतात. त्यामुळे प्रारूप मतदारयादीत झालेल्या चुकांची दुरूरुस्तीच होत नाही. त्याचा फटका मतदानाच्या दिवशी बसतो.

‘उत्तर’मध्ये महिला मतदार अधिक

बेळगाव उत्तर मतदारसंघात या वेळी महिला मतदारांची संख्या वाढली आहे. त्यांची संख्या एक लाख २२ हजार ९०७ इतकी आहे, तर पुरुष मतदारांची संख्या एक लाख २० हजार ९२३ इतकी आहे. बेळगाव दक्षिणमध्ये मात्र पुरुष मतदार जास्त म्हणजे एक लाख २१ हजार ३८० इतके आहेत. महिला मतदार एक लाख १९ हजार ३१९ इतके आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने