रशियाच्या चारशे सैनिकांचा हल्ल्यात मृत्यू

रशिया: रशियाने युक्रेनमधील मोठ्या शहरांवर हल्ले सुरु केलेल असतानाच युक्रेननेही आज प्रतिहल्ला केला. रशियाच्या ताब्यातील दोनेत्स्क भागात केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात रशियाचे सुमारे चारशे सैनिक मारल्याचा दावा युक्रेनने केला.रशियाने गेल्या आठवड्यात युक्रेनची राजधानी किव्ह, खारकिव्ह, खेरसन या भागांमध्ये क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत. एका दिवसात १२० क्षेपणास्त्रही डागण्यात आली होती. युक्रेनने आज प्रतिहल्ला करताना रशियाच्या ताब्यात गेलेल्या दोनेत्स्क भागातील माकिव्हका शहराला लक्ष्य केले. या शहरातील एका इमारतीत रशियाच्या सैनिकांचे वास्तव्य होते.ही इमारत क्षेपणास्त्र हल्ल्यात पाडण्यात आली. रशियाचे सुमारे चारशे सैनिक या हल्ल्यात मारले गेल्याचा आणि तीनशेहून अधिक जखमी झाल्याचा दावा युक्रेनने केला आहे. दरम्यान, रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने मात्र, या हल्ल्यात ६३ सैनिकांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.



रशियाने शनिवारी रात्री बाराचे ठोके पडून नव्या वर्षाला सुरुवात होताच युक्रेनवर क्षेपणास्त्रांचा मारा केला होता. त्यानंतर, आज दुसऱ्या दिवशी याच वेळी युक्रेनने हल्ला केला. युक्रेनने अमेरिकेने पुरविलेल्या क्षेपणास्त्रांच्या साह्याने हा हल्ला केला.रशियाचे सैनिक असलेल्या इमारतीमध्येच दारुगोळाही साठवलेला असल्याने क्षेपणास्त्र कोसळताच प्रचंड मोठा स्फोट झाला. हल्ल्यानंतर सर्वत्र रशियाच्या सैनिकांचे मृतदेह आणि जखमी अवस्थेत पडलेले सैनिक दिसत होते. रशियाच्या अधिकाऱ्यांनीही हल्ला झाल्याचे मान्य केले, मात्र युक्रेनने केलेल्या दाव्यापेक्षा मृतांची संख्या कमी असल्याचे सांगितले. मारले गेलेले सैनिक हे अतिरिक्त सैनिक होते, असेही या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

किव्हवर हल्ले

युक्रेनने केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी रशियाने काही तासांतच युक्रेनची राजधानी किव्हवर हल्ले सुरु केले. ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या साह्याने केलेल्या या हल्ल्यांमध्ये महत्त्वाच्या इमारतींना आणि पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले. हल्ले करण्यासाठी रशियाने इराणी बनावटीच्या ड्रोनचा वापर केला. या हल्ल्यांमध्ये ऊर्जा प्रकल्पांचे मोठे नुकसान झाले. युक्रेननेही हवाई संरक्षण यंत्रणा वापरताना ३९ ड्रोन हवेतच नष्ट केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने