भारतीय बॅडमिंटनपटूंकडून निराशा

नवी दिल्ली : भारतीय बॅडमिंटनपटूंना घरच्या मैदानावर निराशेचा सामना करावा लागला. किदांबी श्रीकांत, मालविका बन्सोड व आकर्षी कश्‍यप यांचा एकेरीत; तर अश्‍विनी भट- शिखा गौतम यांचा दुहेरीत पराभव झाला.भारताचा आघाडीचा खेळाडू किदांबी श्रीकांतला पहिल्याच फेरीत जागतिक क्रमवारीत प्रथम स्थानावर असलेल्या व्हिक्टर ॲक्सेलसनकडून सरळ गेममध्ये पराभूत व्हावे लागले. ॲक्सलसेनने श्रीकांतवर २१-१४ आणि २१-१९ अशी मात केली. दुसऱ्या गेममध्ये ॲक्सलसेन ५-१४ अशा मोठ्या फरकाने मागे होता, मात्र आपल्या अनुभवाच्या जोरावर त्याने उत्कृष्ट स्मॅश आणि बॅकहॅन्ड मारत श्रीकांतवर सरळ गेममध्येच मात केली. त्यामुळे पुरुष एकेरीमध्ये भारताची आशा आता लक्ष्य सेनवर असणार आहे.



महिला एकेरीमध्ये महाराष्ट्राच्या मालविका बन्सोडला थायलंडच्या बुसानन ओंगबमरुंगफन हिने २१-१७ आणि २१-१२ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. बुसानन हिने दीर्घ गेम खेळण्यास प्राधान्य दिले. या सामन्यात एकूण ७१ रॅली खेळल्या गेल्या. महिलांच्या एकेरीमध्ये दुसऱ्या सामन्यात अमेरिकेच्या बेईवेन झांग हिने आकर्षी कश्यपला २१-१५ आणि २१-१२ असे नमवले. बेईवेन हिने या सामन्यात एकूण ४२ गुण जिंकले, तर आकर्षीला फक्त २७ गुणच जिंकता आले.या सामन्यात दोघींनीही आक्रमक खेळ करण्यास प्राधान्य दिले, त्यामुळे या लढतीत कोणालाही नेट पॉईंट प्राप्त करता आला नाही.महिला दुहेरीमध्येही भारताच्या शिखा गौतम आणि अश्विनी भट या जोडीला मलेशियाच्या थॅन पर्ली व थिनाह मुरलीधरन या जोडीकडून २१-८ आणि २१-११ असे सरळ गेममध्ये पराभूत व्हावे लागले. या सामन्यात भारतीय जोडीला मलेशियाच्या जोडीने डोके वर काढण्यास संधीच दिली नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने