गडकरी, पवार, सामंत आज कोल्हापुरात

कोल्हापूर - विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार व राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे (ता. २८) कोल्हापुरात येत आहेत.श्री. गडकरी यांच्या हस्ते बहुचर्चित बास्केट ब्रिजचा पायाभरणी समारंभ सायंकाळी चार वाजता पुणे- बंगळूर महामार्गावर पंचगंगा पुलाजवळ होणार आहे. त्यानंतर सांगली फाट्यावर त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे.तत्पूर्वी श्री. गडकरी यांच्या हस्ते नांदणी (ता. शिरोळ) येथील गणेश बेकरीच्या विस्तारीत प्रकल्पाचे उद्‌घाटन होणार आहे. सायंकाळी पाच वाजता श्री. गडकरी हे खासदार धनंजय महाडिक यांनी भरवलेल्या कृषी प्रदर्शनाला भेट देणार आहेत. तावडे हॉटेल ते दसरा चौक या दरम्यान मनपाच्या वतीने नियोजित उड्डाणपुलाच्या आराखड्याबाबतही या दौऱ्यात सादरीकरण होण्याची शक्यता आहे.



दरम्यान, गडकरी यांचे रात्री उशिरा कोल्हापुरात आगमन झाले. खासदार धनंजय महाडिक यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी आमदार अमल महाडिक आदी उपस्थित होते.शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार संपतबापू पवार-पाटील यांच्या उद्या (ता. २८) होणाऱ्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभासाठी श्री. पवार यांचे आज सायंकाळी कोल्हापुरात आगमन झाले. उद्या सकाळी साडेनऊ वाजता सडोली खालसा (ता. करवीर) येथे हा कार्यक्रम होणार आहे.आमदार हसन मुश्रीफ, राजेश पाटील, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, उद्योजक व्ही. बी. पाटील, आदिल फरास यांनी त्यांचे स्वागत केले. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उद्या (ता. २८) दुपारी जिल्ह्यातील उद्योजकांची बैठक हॉटेल सयाजीमध्ये होणार आहे. तत्पूर्वी श्री. गडकरी व श्री. सामंत यांची विमानतळावर विविध विकासकामांबाबत बैठक होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने