राज ठाकरेंना नडणाऱ्या 'भैया'चा पाय आणखी खोलात; अयोध्या वारीला...

मुंबई : बृजभूषण सिंग... भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष सध्या चांगलेच वादात अडकलेत. अयोध्येला येणाऱ्या राज ठाकरेंना विरोध करणाऱ्या यूपीतील या खासदाराचाच पाय आता आणखी खोलात अडकणार असल्याचं दिसतंय. कारण भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांना कुस्ती पैलवानांनी लक्ष्य केलं.बृजभूषण सिंह आणि कुस्ती महासंघातील प्रशिक्षक महिला कुस्तीपटूंचं लैगिंक शोषण करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. आंदोलक खेळाडूंमध्ये भारतासाठी ऑलिम्पिक, राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये पदक मिळवणाऱ्या काही कुस्तीपटूंचाही समावेश आहे. काहींनी तर खेळाडूंना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचाही आरोप केला गेला. यामुळे जंतरमंतरवरील कुस्तीपटूंचं आंदोलन देशात चर्चेचा विषय ठरला. याच आंदोलनातून खेळाडूंनी बृजभूषण सिंह यांना कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदावरुन हटवा आणि कुस्ती महासंघही बरखास्त करण्याची मागणी केली.१८ जानेवारीपासून भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू राजधानी दिल्लीतील जंतरमंतरवर बृजभूषण सिंह आणि भारतीय कुस्ती महासंघाविरोधात आंदोलनाला बसले होते. पण अखेर काल क्रीडा मंत्र्यांसोबत झालेल्या सात तासांच्या बैठकीनंतर त्यांनी आंदोलन मागे घेतलं.




आंदोलन मागे घेतलं कारण...

-भारतीय ऑलम्पिक संघाने सात सदस्यीय समितीची घोषणा केली

-ही समिती बृजभूषण सिंह यांच्यावरील आरोपांची ४ आठवड्यांच्या आत चौकशी करेल.

-या समितीत मेरी कॉम, डोला बॅनर्जी, अलकनंदा अशोक, योगेश्वर दत्त, सहदेव यादव आणि कायदातज्ज्ञांचा समावेश असेल.

-चौकशी पूर्ण होईपर्यंत ब्रिजभूषण शरण सिंह कुस्ती महासंघापासून स्वतःला लांब ठेवतील आणि चौकशीत सहकार्य करतील

-बृजभूषण सिंह पदापासून लांब असेपर्यंत कुस्ती महासंघाचं काम एक समिती करेल

तरी, १९ जानेवारीलाही केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी पैलवानांच्या सर्व समस्या ऐकून घेण्यासाठी त्यांना जेवणासाठी बोलावलं होतं. पण त्या बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नव्हता. तरी, आता क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघाला आपलं म्हणणं मांडण्यासाठी ७२ तासांचा वेळ दिला आहे. तोपर्यंत ब्रिजभूषण सिंह यांना वेळ द्यायला हवा असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे.तर तिकडे पैलवानांनी केलेले सर्व आरोप बृजभूषण सिंह यांनी फेटाळून लावलेत. दरम्यान, कुस्ती पैलवानांच्या आरोपांमुळे वादात अन् देशभरात चर्चेत आलेले बृजभूषण नुकतेच महाराष्ट्रातही येऊन गेले. निमित्त होतं महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं. याच महाराष्ट्र केसरी स्पर्धेत ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शेजारी बसलेले संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिले. पण याच बृजभूषण सिंहांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला तेव्हा फडणवीसांनी मौन बाळगलं होतं. त्यामुळे आता राज ठाकरेंना नडणारा, अयोध्या दौऱ्याला विरोध करणारा हा नेता स्वत:च वादाच्या गर्तेत अडकलाय हे निश्चित. चौकशीअंती काय सत्य येतं ते पाहणं महत्वाचं असेल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने