राष्ट्रवादीचेही दोन तुकडे करा

कोल्हापूर: ‘राष्ट्रवादीने कपटनीतीने शिवसेनेचे दोन तुकडे केले. त्याची परतफेड येत्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन तुकडे करून कोल्हापूरचे पाचही शिवसेनेचे आमदार निवडून आणून जिल्ह्यातील जनतेने करावी,’ असे आवाहनपालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.येथे बाळासाहेबांची शिवसेनेतर्फे कागल तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंचांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री केसरकर बोलत होते. खासदार संजय मंडलिक अध्यक्षस्थानी होते. आमदार प्रकाश आबिटकर, सुजित चव्हाण, वीरेंद्र मंडलिक आदी प्रमुख उपस्थित होते.

मंत्री केसरकर म्हणाले, ‘‘मी कितीकाळ पालकमंत्री पदावर राहीन माहिती नाही, पण येत्या सहा महिन्यांत कोल्हापूरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन दाखवू. कोल्हापूरचे नाव भारतात प्रथम क्रमांकावर यावे, यासाठी पहिल्या दिवसापासून मी प्रयत्नशील आहे.कोट्यवधींचा निधी पंचगंगेच्या पाणी प्रदूषणासाठी दिला आहे. कोणीही पैशाला विकला जात नाही. जे लोकांना प्रेम देतात, त्यांच्या मागे जनता राहते. राज्यातील जनतेला न्याय देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत.’’खासदार संजय मंडलिक म्हणाले, ‘‘दुर्दैवाने आम्हाला निधी मिळाला नाही. आता सत्तेत आल्यानंतर निधी मिळत आहे. नजीकच्या काळात कोल्हापूर जिल्हा बाळासाहेबांच्या शिवसेनेचा असेल. मतदारसंघात चांगला निधी खेचून आणू.






जनतेला काय पाहिजे, हे बघून लोकप्रतिनीधींनी सर्वांना एकत्रित करून विकासकामे करावीत. नजीकच्या काळात सरपंचांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले जाईल.’’ या वेळी आमदार आबिटकर, वीरेंद्र मंडलिक, सत्यजित पाटील यांचीही भाषणे झाली.कार्यक्रमात जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सत्यजित पाटील, बाबा नांदेकर, शिवाजी चौगुले, तसेच शेतकरी सहकारी संघावर प्रशासकपदी नियुक्ती झाल्याबद्दल सूर्याजी देसाई व जयवंत पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या वेळी अनिरुद्ध रेडेकर, संजय पाटील, दिवाकर पाटील, सचिन भोसले, संजय संकपाळ, कल्लाप्पा निउंगरे, विजय बलुगडे, संग्राम सावंत, दिग्वजिय पाटील, राजेखान जमादार, सुधीर पाटोळे आदी उपस्थित होते.

पाच कोटींचे खेळाचे कॉम्प्लेक्स बांधणार

‘मुरगूड शहरासाठी खेळाचे मैदान नाही. म्हणून पाच कोटींचे खेळाचे कॉम्प्लेक्स व साई कुस्ती आखाड्याला विशेष बाब म्हणून सुसज्ज वसतिगृह देण्यासाठी प्रयत्न करू,’ अशी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी ग्वाही दिली, तर मुरगूडला कोर्ट व्हावे.यासाठीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे गेलेला आहे. त्यासाठी पालकमंत्र्यांनी पाठपुरावा करावा, असे आवाहन खासदार मंडलिक यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने