१८ लाखांचं घर, ड्रग तस्करी आणि अंजलीच्या मृत्यूचं गूढ, कोणत्या प्रश्नांच्या घेऱ्यात अडकत चालली आहे निधी?

दिल्ली: १ जानेवारी २०२३ चा रविवार दिल्लीत उजाडला तो एक भयंकर बातमी घेऊन. अंजली सिंह या मुलीचा अपघाती मृत्यू झाला. तिचा मृतदेह कारने १२ ते १३ किमी फरफटत नेला होता. अंजलीचा अपघात इतका भीषण होता की पोलिसांना अंजलीचा मृतदेह विवस्त्र आणि छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. तिच्या मृत्यूला दहा दिवस झाले आहेत. मात्र एका ठोस निर्णयापर्यंत पोलीस आलेले नाहीत. अशात अंजलीची मैत्रीण या घटनेची साक्षीदार असलेल्या निधीकडे संशयाची सुई आहे.

निधीबाबत काय संशय?

निधी ही दिल्लीत घडलेल्या अंजली सिंहच्या अपघाताची एकमेवस साक्षीदार आहे. निधीने हा दावा केला आहे की अपघात झाला त्याआधी अंजली नशेत होती. अशात पोलिसांची नजर निधीच्या पूर्वायुष्यावर गेली. त्यात निधी ड्रग पेडलर असल्याचं आणि तिला एक महिना तुरुंगात रहावं लागल्याचं समोर आलं आहे. निधी गेल्या दोन वर्षांपासून जामिनावर बाहेर आहे. आता निधीवर अंजलीच्या मृत्यू प्रकरणात पुन्हा एकदा अटकेची टांगती तलवार लटकते आहे.



जीआरपीने निधीला केली होती अटक

अंजलीचा मृत्यू ३१ डिसेंबरच्या रात्री झाला. त्याआधी निधी आणि अंजली यांच्यात कडाक्याचं भांडण झालं होतं. मात्र त्या रात्री काय घडलं होतं हे अद्याप निधीने सांगितलेलं नाही. दुसरीकडे पोलिसांना निधीचं ते रेकॉर्ड आढळलं आहे ज्यामुळे निधीला ड्रग पेडलर म्हणून अटक करण्यात आल्याची नोंद आहे. जीआरपीने ही कारवाई केली होती.

६ डिसेंबर २०२० ला काय घडलं होतं?

पोलिसांकडे ज्या नोंदी आहेत त्यामध्ये निधीचे फोटो आणि संपर्क क्रमांक, पत्ता हे सगळं आहे. निधीच्या विरोधात जी एफआयआर करण्यात आली त्यात एनडीपीएस अॅक्टच्या कलम ८ आणि २० यांचा उल्लेख आहे. १ वाजून १७ मिनिटांनी आगरा स्टेशनवर तिला अटक करण्यात आली होती.

एफआयआरमध्ये नोंद केलेला घटनाक्रम काय आहे?

अंजलीच्या मृत्यू प्रकरणात अडकत चाललेल्या निधीच्या विरोधात जी एफआयआर दाखल करण्यात आली आहे ती आगरा कँटच्या जीआरपी पोलिसांनी केली. त्यांनीच तिला अटक केली होती. या एफआयआर मध्ये नोंद केली आहे की प्लॅटफॉर्म क्रमांक ३ च्या पुलाच्या बाजूला जो स्टिलचा बेंच आहे त्या ठिकाणी बसलेल्या दोन व्यक्त आणि एक मुलगी यांनी आम्हाला (पोलीस) पाहून हातात बॅग घेतली आणि घाई घाईने तिथून निघून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांचा संशय आल्याने थांबवण्यात आलं. पण ते कुणीही थांबले नाहीत. मग आमचा संशय आणखी पक्का झाला. मग निधीला ती निघाली होती तिथून साधारण ३० पावलांवर एका महिला पोलिसाने अटक केली. जेव्हा या तिघांनाही आम्ही पकडलं तेव्हा त्यांना विचारणा केली की बॅग घेऊन का पळत होतात? तेव्हा त्यांनी त्यांच्या बॅगेत गांजा असल्याचं सांगितलं.या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी सांगितलं की निधीसोबत बिहारच्या औरंगाबादमध्ये राहणारा तरूण समीर आणि दिल्लीत राहणारा तरूण रवि कुमार या दोघांनाही अटक करण्यात आली होती. हे तिघेही ड्रग्ज सप्लाय करणाऱ्या एका रॅकेटचा भाग होते. यानंतर सुमारे महिनाभर निधी तुरुंगात होती. आज तकने हे वृत्त दिलं आहे.

सुल्तानपुरी भागात निधीने विकत घेतलं १८ लाखांचं घर

निधी दोन वर्षांपूर्वी झोपडपट्टीत राहात होती. तशी नोंद पोलीस रेकॉर्डमध्ये आहेत. मात्र गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात निधीने १८ लाख रूपये खर्चून एक घर विकत घेतलं आहे. पोलिसांच्या निदर्शनास ही बाबही आली आहे.अंजलीच्या मृत्यू प्रकरणाची सुनावणी सुरू असताना पोलिसांनी एक सीसीटीव्ही फुटेजही सादर केलं. त्यात एक आरोपी कारमध्ये अंजली अडकली आहे हे पाहतो. मात्र तो तिला मदत करत नाही. सगळे कारमध्ये परत बसतात आणि कार पळवू लागतात. पोलिसांनी सोमवारी सगळ्या आरोपींना कोर्टात सादर केलं होतं. कारण त्यांची पोलीस कोठडी संपली होती. आता पोलिसांनी या सगळ्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. या आरोपींपैकी एक आरोपी अंकुश जामीन मंजूर झाल्याने बाहेर आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने