बौद्ध धर्माविरुद्ध चीनची मोहीम; दलाई लामा

तिबेट: बौद्ध धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न चीनकडून करण्यात येत आहे, तरीही लोकांचा बौद्धधर्माकडे ओढा वाढला आहे, असे प्रतिपादन तिबेटचे सर्वोच्च धार्मिक नेते दलाई लामा यांनी आज केले. बोधगयामध्ये आयोजित केलेल्या तीन दिवसांच्या कार्यक्रमाचा समारोपावेळी बोलताना दलाई लामा यांनी चीनवर टीका केली.दोन दिवसांपूर्वी बिहार पोलिसांनी चिनी गुप्तहेर महिलेला अटक केली होती. ही महिला तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांची हेरगिरी करत असल्याचे दिसून आले होते. ``चीन बौद्ध धर्माला विषारी समजत आहे. धर्म नष्ट करण्यासाठी मोहीम राबवण्यात येत आहे.



बौद्धविहार तोडण्यात आले. तरीही बौद्ध धर्म आपल्या जागी उभा आहे. बौद्ध धर्माचे नुकसान केले, तरी सुद्धा चीनमधील लोकांची आस्था कमी झाली नाही, ’’ असे दलाई लामा यांनी म्हटले आहे.‘‘तिबेटच्या बौद्ध परंपरेने पश्चिमेकडील लोकांचे बरेच लक्ष वेधून घेतले आहे. पूर्वी बौद्ध धर्म हा आशियायी धर्म म्हणून ओळखला जात होता. पण आज त्याचे तत्त्वज्ञान आणि संकल्पना, विशेषतः मानसशास्त्राच्या संदर्भातील संकल्पना जगभरात पसरल्या आहेत.

अनेक शास्त्रज्ञ या परंपरेत रस घेत आहेत. हे केवळ तिबेटसाठीच नाही तर चीनसाठीही महत्त्वाचे आहे. त्याचा थेट परिणाम चीनवरही होतो, कारण चीन हा बौद्ध देश आहे पण चीनमध्ये बौद्ध धर्मावर आणि बौद्ध धर्मियांवर दडपशाही करण्यात आली,’’ असे दलाई लामा यांनी म्हटले आहे.‘‘तिबेटला हिमभूमी असेही संबोधिले जाते. अनेक संकटांचा सामना तिबेटला करावा लागला. परंतु, त्यावर त्यांनी मात केली. तिबेटच्या बौद्ध परंपरेची माहिती जगाला अधिक चंगल्या प्रकारे झाली आहे,’’असे सांगून दलाई लामा म्हणाले, ‘‘ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसारच्या नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी माझ्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जात आहे, हा योगायोग आहे. भविष्यकाळाकडे आपण अधिक आशेने आपण पाहत आहोत.’’

माझे आयुष्य ११५ वर्षांचे

‘‘मी शंभर वर्षांहून अधिक वर्षे या शरीराला धारण करून तिबेटी परंपरेचे जनत करेन. मला स्वप्न पडले होते. त्यानुसार मी ११५ किंवा ११६ वर्षे जिवंत राहीन. शरीराच्या माध्यमातून त्रिपिटकाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न मी करत आहे,’’ असे प्रतिपादनही दलाई लामा यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने