एसटी संपकाळातील कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा

मुंबई: एसटी संपकाळातील कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. संपकाळात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना त्यांच्या जागी नोकरी देण्याची निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.संप काळात १२४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. ज्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आता त्यांच्या जागी वारसांना नोकरी देण्यात येणार आहे.गेल्यावर्षी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप हा प्रचंड गाजला होता. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी शेवटपर्यंत लावून धरली होती. त्यासाठी एसटी कर्मचारी जवळपास सहा महिने मुंबईच्या आझाद मैदानावर ठाण मांडून बसले होते.



या काळात विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आणि गुणरत्न सदावर्ते यांनी या आंदोलनाचे नेतृत्त्व केले होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे ठाकरे सरकार कोंडीत सापडले होते.एसटी कर्मचाऱ्यांनी २७ ऑक्टोबर २०२१ पासून काम बंद आंदोलन सुरू केले होते. मार्च २०२२मध्ये न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर कर्मचाऱ्यांनी कामावर येण्यास सुरुवात केली. संपकाळात पगाराविना आर्थिक संकटापुढे टिकाव न धरू शकलेल्या १२४ अधिक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करत आपले जीवन संपवले होते.या संपामुळे एसटी महामंडळाचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते. जवळपास चार महिने एसटी सेवा ठप्प होती. तरीही एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याची मागणी मान्य झाली नव्हती. परंतु, सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात पाच हजार, चार हजार आणि अडीच हजार रुपयांची वाढ केली होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने