द्राक्षांच्या कमी निर्यातीचा देशांतर्गत ताण!

 नाशिक : कोरोनाअगोदर तीन वर्षे रशियामध्ये २५ ते ३० हजार टन द्राक्षांची दर वर्षी निर्यात झाली. मात्र रशिया-युक्रेन युद्धाला सुरवात झाली आणि हळूहळू गेल्या वर्षी द्राक्षांची निर्यात थांबली. गेल्या वर्षी १७ जानेवारीपर्यंत रशियात सहा हजार ५५९ टन निर्यात झाली होती. यंदा आतापर्यंत रशियामध्ये एक हजार ५९५ टन द्राक्षांची निर्यात झाली आहे.त्यामुळे कमी होणाऱ्या जवळपास १५ हजार टन द्राक्षांचा देशांतर्गत बाजारपेठेवर ताण वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांची चीनसह दुबई आणि बांगलादेशमधील ग्राहकांकडून अपेक्षा आहेत.युरोपमधील निर्यातीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जवळपास २०० टनांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यातून युरोपमध्ये ७२१ टन, तर यंदा आतापर्यंत ९२२ टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. युरोपखेरीज इतर देशांमध्ये गेल्या वर्षी सात हजार २९६ टन द्राक्षांची निर्यात झाली होती.यंदा हीच निर्यात साडेचार हजार टनापर्यंत पोचली आहे. म्हणजेच, हंगामाच्या सुरवातीला तीन हजार टनाच्या कमी निर्यात झाली आहे. ती प्रामुख्याने रशियामधील आहे. त्यावरून रशियामधील निर्यातीची स्थिती स्पष्ट होण्यास मदत होते.



गेल्या वर्षी ‘पेस्ट कंट्रोल फ्री’साठी चीनतर्फे ऑनलाइन ‘पॅक हाऊस ऑडिट’ करण्यात आले. ही प्रक्रिया संपली आणि द्राक्षांच्या निर्यातीला परवानगी मिळाली, परंतु तोपर्यंत गेल्या वर्षीचा द्राक्षांचा हंगाम संपला होता.यंदा चीनमधील द्राक्षांच्या निर्यातीसाठी परवानगी असल्याचे निर्यातदार सांगतात. त्यामुळे ओझरमधील द्राक्षबागायतदार संघाच्या कार्यालयात होणाऱ्या निर्यातदारांच्या संघटनेच्या सभेत त्याबद्दलची भूमिका स्पष्ट होईल, असे महाराष्ट्र द्राक्षबागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले यांनी सांगितले.श्री. भोसले म्हणाले, की यंदा शेतकऱ्यांनी ‘रेस्यूडी फ्री’ द्राक्ष उत्पादनाकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे युरोपमधील निर्यातीत वाढ होण्यास मदत होणार आहे. दुबईचे व्यापारी गोल आकाराची द्राक्षे घेण्यास तयार होतील काय? याची चाचपणी करण्यात येत आहे.बांगलादेशमध्ये मार्चअखेरपर्यंत लांबट आकाराची द्राक्षे स्वीकारल्यावर एप्रिलमध्ये गोल आकाराच्या द्राक्षांकडे कल राहतो. त्यामुळे हंगामाला यंदा सुरवात झाल्यावर गोल आकाराची द्राक्षे बांगलादेशमध्ये खपविण्यासाठी काय करावे लागेल, यासंबंधाने निर्यातदारांशी चर्चा केली जाणार आहे.

युरोपमधील द्राक्षांच्या निर्यातीची स्थिती

(आकडे नाशिक जिल्ह्यातील टनामध्ये)

१ नोव्हेंबर २०२१ ते १७ जानेवारी २०२२ : बेल्जियम- १३, नेदरलँड- ६२१.११, जर्मनी- १३, लिथुनिया-१४.२६, पोलंड- ३३.६९, स्वीडन- १३ १ नोव्हेंबर २०२२ ते १७ जानेवारी २०२३ : लॅटिविया- २७.८५, रोमानिया- २६.८५, नेदरलँड- ८२८.०९

इतर देशांमध्ये नाशिकमधून झालेली निर्यात (आकडे टनामध्ये)

- १ नोव्हेंबर २०२१ ते १७ जानेवारी २०२२ : श्रीलंका- १४१.८९, रशिया- ६५५८.८, मलेशिया- ६२.१०, युक्रेन-७७.५५, थायलंड- २९८.४७, अरब अमिराती- ६०.४५, कुवेत- १६.८४, सौदी अरेबिया- ३०.७, बेलारूस-३६.६०, तैवान- १२.४८ - १ नोव्हेंबर २०२२ ते १७ जानेवारी २०२३ : कतार- १५.७७, रशिया- १५९५.४१, अरब अमिराती- ५२.८०, सिंगापूर- २५.४८, तैवान- २५.४८, व्हिएतनाम- २०, तुर्की- १४३.५१, मलेशिया- ५०.९६, थायलंड- १८.७०, ओमान- १३.८२, सौदी अरेबिया- ३०.६

(याशिवाय यंदा कृषी विभागाच्या माहितीनुसार इतर देशांमध्ये आणखी अडीच हजार टन द्राक्षांची निर्यात झाली.)"द्राक्षांच्या निर्यातीसाठी प्रयोगशाळेतून तपासणी करून घेताना ‘रेस्यूडी फ्री’ची चाचणी केली जाते. आता द्राक्षांमध्ये साखरेचे प्रमाण किती आहे, याची तपासणी करण्यासंबंधी प्रयोगशाळांना सूचना देण्यात यावी, अशी विनंती द्राक्षबागायतदार संघातर्फे ॲगमार्क, अपेडा आणि कृषी विभागाला करण्यात आली आहे." -

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने