ISROचे वैज्ञानिक नंबी नारायण यांच्यावरील आरोप खोटे; सीबीआयची हायकोर्टात माहिती

 नवी दिल्ली : ISROचे माजी वैज्ञानिक नंबी नारायण यांना झालेली अटक बेकायदा असून त्यांच्यावरील आरोप खोटे आहेत अशी माहिती केंद्रीय तपास एजन्सीनं केरळ हायकोर्टाला दिली आहे. 90च्या दशकात नंबी नारायण यांच्याविरोधात चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध सीबीआयने नोंदवलेल्या खटल्याची केरळ उच्च न्यायालयात सध्या सुनावणी सुरू आहे. 




सीबीआयनं हायकोर्टाला सांगितलं की, सन १९९४ मधील इस्त्रोविरोधातील हेरगिरी प्रकरणात वैज्ञानिक नंबी नारायण यांच्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे असून त्यांना झालेली अटकही बेकायदा होती. अशा प्रकारे खोट्या केसेस दाखल करणं ही राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं गंभीर बाब होती. इस्त्रोच्या वैज्ञानिकाविरोधातील या कट-कारस्थानात परदेशी शक्तींचा सहभाग देखील होता.नंबी नारायण यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं की, भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या क्रायोजेनिक इंजिनला थांबवण्यासाठी हा कट रचण्यात आला होता. त्यानंतर सीबीआयनं देखील नारायण यांच्यावरील आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे. आरोपी अधिकाऱ्यांच्या जामीन अर्जावर न्यायालय विचार करत असताना सीबीआयनं हे विधान केलं आहे.नंबी नारायण यांच्या जीवनावर आधारित रॉकेट्री नावाचा सिनेमा नुकताच आला होता, यामध्ये अभिनेता आर. माधवन यानं प्रमुख भूमिका साकारली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने