Faraaz Trailer: “पहले इंसान बन, फिर सोचना मुस्लिम…” २ मिनिटं ६ सेकंदांच्या ‘फराज’ ट्रेलरचा इंटरनेटवर धुमाकूळ

मुंबई: मागच्या काही काळापासून चर्चेत असलेल्या ‘फराज’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज झाला असून, त्यात दहशतवाद्यांचं भीषण सत्य पाहायला मिळत आहे. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचा नातू जहान कपूर आणि परेश रावल यांचा मुलगा आदित्य रावलही या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. २ मिनिट ६ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये तरुण दहशतवाद्यांचा एक समूह एका महागड्या कॅफेमध्ये नरसंहार घडवताना दिसत आहे. हंसल मेहता दिग्दर्शित, अनुभव सिन्हा निर्मित हा चित्रपट ३ फेब्रुवारी २०२३ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

‘फराज’ चित्रपट ढाका येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची कथा आहे, जिथे दहशतवाद्यांनी एका कॅफेवर हल्ला करून अनेक निष्पाप लोकांना निर्दयपणे ठार केलं होतं. चित्रपटात परेश रावल यांचा मुलगा आदित्य मुख्य दहशतवाद्याच्या भूमिकेत आहे आणि फराज म्हणजेच जहान कपूर एका तरुणाच्या भूमिकेत आहे जो जीव वाचवण्यासाठी दहशतवाद्यांशी वाद घालतो आणि त्यांना चांगलंच सुनावतो. चित्रपटाच्या ट्रेलरने सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.



ट्रेलरचे काही संवाद लोकांच्या हृदयाला आणि मनाला हेलावून टाकणारे आहेत. या ट्रेलरमध्ये एक संवाद आहे ज्यामध्ये दहशतवादी त्यांचं मिशन पूर्ण करताना म्हणतो, “इस्लाम धोक्यात आहे.” त्याच वेळी फराज त्याला सुनावतो, “गप्प बस, आमची ओळख फक्त आमच्या धर्मातूनच नाही तर आमच्या संस्कृतीतून होते. आधी माणूस व्हा, मग विचार करा की मुस्लिम असणं काय असतं.” ट्रेलरमध्ये दहशतवाद्यांवर जवानांच्या कारवाईची झलकही पाहायला मिळत आहे. फराजच्या व्यक्तिरेखेला लोकांकडून भरभरून प्रेम मिळताना दिसत आहे.या चित्रपटाचं दिग्दर्शन हंसल मेहता यांनी केलं असून भूषण कुमार, अनुभव सिन्हा, साक्षी भट्ट, साहिल सहगल आणि मजहिर मंदसौरवाला हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. जहान कपूर आणि आदित्य रावल यांच्याशिवाय या चित्रपटात जुही बब्बर, आमिर अली, सचिन लालवानी, पलक लालवानी आणि रेशम सहानी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने