‘ड्रॅगन’ची आर्थिक विकासात घसरगुंडी

बीजिंग : चीनची अर्थव्यवस्था २०२२मध्ये तीन टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या वर्षी चीनचा विकासदर चार दशकांत दुसऱ्यांदा नीचांकी पातळीवर राहिला. चिनी सरकारने मंगळवारी आर्थिक विकासाची आकडेवारी जाहीर केली. कोरोनाची महासाथ आणि बांधकाम व्यवसायातील घसरण यासाठी कारणीभूत असल्याचे सांगण्यात आले.जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनचा आर्थिक विकास दर २०२२ मध्ये केवळ तीन टक्क्यांनी वाढला आहे. २०२१मध्ये हा दर ८.१ टक्के होता.गेल्या वर्षी त्याची घसरण निम्म्यापेक्षाही जास्त प्रमाणात झाल्याचे चीनच्या ‘नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक’ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून दिसत आहे.१९७१ पासून चीनचा हा दुसरा नीचांकी आर्थिक विकास दर आहे. याआधी कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे २०२०मध्ये विकास दर २.४ टक्क्यांपर्यंत घसरला होता.



कोरोना साथीमुळे चीनमधील कम्युनिस्ट पक्षाच्या सत्ताधाऱ्यांनी लाखो नागरिकांना घरात डांबून ठेवणाऱ्या निर्बंध आंदोलनानंतर डिसेंबरमध्ये शिथिल केल्याने ग्राहकोपयोगी आणि उद्योग क्षेत्र उभारी धरू लागले आहेत.पण अजूनही चीनमध्ये कोरोनारुग्णांची संख्या वाढत असल्याने मॉलमध्ये आणि हॉटेलमध्ये ग्राहक येण्याचे प्रमाण हळूहळू वाढत आहे. कोरोनाच्या लाट सर्वोच्च बिंदू गाठून ओसरली असल्याचा दावा चीन सरकारने केला आहे.चीन सरकारने भविष्यात ५.५ टक्के विकास दराचे उद्दिष्ट ठेवले आहे. २०२१ मधील ८ टक्के ‘जीडीपी’पेक्षा तो खूप कमी आहे. ‘नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक’नुसार डिसेंबरमध्ये संपलेल्या चौथ्या तिमाहीत विकास दर २.९टक्क्यांपर्यंत घसरला होता. तिसऱ्या तिमाहीत तो ३.९ टक्के होता.

विकास दर घटण्याची कारणे

  • तेल, अन्न, ग्राहकोपयोगी वस्तू आणि अन्य साहित्याच्या आयातीत घट

  • जागतिक पुरवठा साखळीत विस्कळित झाल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम

  • ‘झिरो कोविड’ मोहिमेअंतर्गत कठोर लॉकडाउन, विलगीकरण आणि सामूहिक कोरोना चाचण्यांमुळे उत्पादन क्षेत्र बाधित

  • बांधकाम क्षेत्रात मरगळीचे वातावरण

  • वाढत्या चलनवाढीचा सामना करण्यासाठी चीनने व्याजदरात वाढ केल्यानंतर अमेरिका आणि युरोपकडून चिनी वस्तूंच्या मागणीत झालेली घट

यंदा सुधारणा होण्याचा अंदाज

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि खासगी क्षेत्राने चीनचा विकास दर यंदा सुधारण्याचा अंदाज व्यक्त केला आहे, पण तरीही तो कमाल पाच टक्क्यांपर्यंत राहील, असेही सांगण्यात येत आहे.आगामी वर्षाच विकास दरात चांगली वाढ दिसेल, असा अंदाज ‘गोल्डमन सॅच’चे अर्थतज्ज्ञ अँड्र्यू टिल्टन यांनी नुकताच व्यक्त केला आहे. यंदा आर्थिक विकास ४.५ वरून ५.२ टक्क्यांपर्यंत पोहोचेल, असे त्यांचे म्हणणे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने