विदेशी पाहुण्यांसाठी पुण्याची रोषणाई म्हणजे तात्पुरता मेकअप ?

पुणे: जी २० या जागतिक परिषदेचं अध्यक्षपद भारताकडे येणं हा भारतासाठी बहुमानच आहे. त्यातही ही परिषद पुण्यात होत असणं ही बाब पुण्यासाठीही महत्वपूर्णच आहे. यानिमित्ताने जगभारातले मान्यवर पुण्यात येऊन जागतिक पातळीवरच्या प्रश्नांविषयी चर्चा करणार आहेत. त्यांचं आदरातिथ्य करण्यासाठी शहरही सजलं आहे.पण हे सौंदर्यीकरण म्हणजे मेकअप करून चेहऱ्यावरचे डाग तात्पुरते लपवण्यासारखे आहे. कारण ज्या पध्दतीने एका रात्रीत पुणे सजले ते बघून पुणेकरांचेच डोळे सकाळी आश्चर्याने विस्फारले. २६ जानेवारीला ठरावीक ठिकाणीच लागणारी तिरंग्याची रोषणाई अचानक प्रत्येक रस्त्याच्या प्रत्येक विजेच्या खांबावर दिसली. पुणेकरांसाठी हा सुखद धक्का होता. पण त्यासोबत काही प्रश्नही घेउन आले.

  • ही सजावट करायला जी२० सारख्या सोहळ्यांची पुणेकरांना वाट बघावी लागेल का?

  • तात्पुरत्या सजावटीनंतर पुणे परत जैसे थेवरच येणार का?

  • याची निगा नंतर राखली जाणार का?

  • हे सौदर्यीकरण करताना काही बेसिक सौंदर्यदृष्टीचा विचार का केला गेला नाही?




पुण्यात केलं गेलेलं हे सौंदर्यीकरण जुगाडू आहे हे तर उघडच आहे. याची ठोस उदाहरणं

  • रस्त्याची कामं, मेट्रोच्या कामामुळे जिथे राडारोडा पडला आहे तो तिथून हटवण्याऐवजी हिरवे कापड किंवा पत्रे लावून तात्पूरते झाकण्यात आले आहेत.

  • बालभारतीच्या पुस्तकांचं शिल्प जे मुद्दान काळ्या दगडांमध्ये बनवण्यात आलं होतं. त्याच्या संकल्पने मागचा विचार न करता हे शिल्प घाईगडबडीत सुशोभीकरणाच्या नावाखाली भडक रंगांनी रंगवण्यात आलं आहे.

  • सेनापती बापट रोड, विद्यापिठ रोड अशा प्रमुख रस्त्यांवर मनात येईल तिथे चायनीज फुग्यांचे दिवे लावण्यात आले आहेत. त्यामुळे इथे नवीन हॉटेल, धाबा सुरू झाला आहे का? अशी शंका येते. मग पुढचा प्रश्न येतो की, परदेशी मान्यवर भारतात आले की, चीन मध्ये?

  • सेनापती बापट रस्त्यावर फूटपाथ लाल रंगात रंगवण्याची सौंदर्यदृष्टी कोणाची असा प्रश्न पडतो. पण त्यापुढे सर्वात मोठा प्रश्न पडतो तो म्हणजे जर एखाद्या खास गोष्टीसाठी हे सुशोभीकरण करण्यात येत असेल तर मग लगेचच तिथं खोदकाम कसं होतं? यंत्रणेत आपापसात संवाद नाही का?

  • रस्तोरस्ती प्रत्येक वीजेच्या खांबावर केलेली तिरंग्याची रोषणाई सुंदरच दिसते. पण ज्या खांबासाठी पांढरे लाइट संपले तिथे निळ्या लाइटांची माळ वापरण्यात आली. हा सामान्य बदलही पुणेकरांच्या चाणाक्ष नजरेतून सुटलेला नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने