...तर कोल्हापुरात मेट्रो सेवा शक्य

कोल्हापूर : ‘‘लोकसंख्या २० लाखांपेक्षा जास्त आहे, त्या शहरात मेट्रो सुरू होते, असा नियम आहे. कोल्हापूरची लोकसंख्या तेवढी नाही. त्यामुळे सध्या तरी मेट्रो सुरू होऊ शकणार नाही. मात्र, कोल्हापूरकरांनी मनावर घेतले तर विशेष बाब म्हणून कोल्हापुरात मेट्रो सुरू होऊ शकते.पण, त्यासाठी कोल्हापूरची हद्दवाढ होणे क्रमप्राप्त आहे,’’ असे मत रेल्वे खात्यातील निवृत्त मुख्य अभियंता दीपक दिवटे यांनी आज येथे व्यक्त केले. कोल्हापूर इंजिनिअर्स असोसिएशनच्या चर्चासत्रात ते बोलत होते. खासदार संजय मंडलिक उपस्थित होते.कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाबाबतचे सादरीकरण श्री. दिवटे यांनी केले. ते म्हणाले, ‘‘कोल्हापूरची हद्दवाढ झाली तर लोकसंख्येच्या नियमानुसार कोल्हापुरात मेट्रो सुरू करता येऊ शकेल. संपूर्ण कोकण कोल्हापूरवर बाजारपेठेसाठी अवलंबून आहे.



कोल्हापुरातील भाजीपाला, धान्य आणि गूळ निर्यात करण्यासाठी कोकण जवळचे ठिकाण आहे. त्यामुळे कोल्हापूर-कोकणला जोडणारा कोल्हापूर - वैभववाडी रेल्वे मार्गाचे काम होणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रस्तावित मार्गाचा दोनवेळा सर्व्हे झाला आहे.या मार्गाचे काम सुरू झाल्यानंतर चार वर्षात रेल्वेमार्ग सुरू होईल. १०७ किलोमीटरच्या रेल्वेमार्गात २८ किलोमीटरचे बोगदे निर्माण करावे लागणार आहेत. हे काम कठीण असले तरी कोकण रेल्वे कार्पोरेशनच्या माध्यमातून करण्यास वेळ लागणार नाही.मात्र हे काम इतर कंपनीला दिल्यास त्याला वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोल्हापुरातील लोकप्रतिनिधींनी या रेल्वेमार्गासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे.’’खासदार संजय मंडलिक म्हणाले, ‘‘कोल्हापूरचा पायाभूत विकास करण्यासाठी आम्ही लोकप्रतिनिधी कटिबद्ध आहोत.येत्या ३१ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनामध्ये कोल्हापूर - वैभववाडी रेल्वेमार्गाचे काम त्वरीत सुरू व्हावे, अशी मागणी आम्ही करू.’’ आतापर्यंत हे काम सुरू व्हायला हवे होते मात्र आमचेच गणित चुकल्याची खंत मंडलिक यांनी व्यक्त केली. यावेळी इंजिनिअरिंग असोसिएशनचे सचिव राज डोंगळे, विजय पाटील, प्रशांत काटे, निशांत पाटील, उमेश कुंभार, प्रशांत पत्की उपस्थित होते.

प्रस्तावित मार्ग रेडझोनमध्ये

कोल्हापूर-वैभववाडीचा रेल्वेमार्ग वळिवडे, कसबा बावडा, रजपूतवाडी, खुपिरे, कळे व गगनबावडा मार्गे वैभववाडीला जोडला जाणार आहे. मात्र, हा परिसर रेडझोनमध्ये येतो. दरवर्षी पुराचे पाणी आल्यास रेल्वेमार्ग जोडला कसा जाऊ शकतो, असा सवाल सदस्यांनी केला.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने