पोलिस शिपाई भरतीसाठी ‘RFID’

कोल्हापूर : राज्य राखीव दलातील पोलिस शिपाईच्या भरतीसाठी ‘आरएफआयडी’ पद्धत वापरली जात आहे. यामध्ये छातीला लावलेल्या क्रमांकामध्ये एक ‘चीप’ असते.त्याद्वारे पुढील भरती प्रक्रियेची सर्व नोंद होते. सध्या मुंबईतील पोलिस भरतीसाठी ही पद्धत वापरात येत आहे. कालपासूनच येथील ७३ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.रोज हजार उमेदवारांना बोलविण्यात आले आहे. एकूण १४ हजार ९४५ उमेदवार असणार आहेत. राज्यात राखीव दलातील पोलिस शिपाई पदाच्या भरतीची प्रक्रिया येथील पोलिस मुख्यालयातील मैदानावर सुरू आहे.काल पहाटे पाचपासून ही प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी ७३७ उमेदवारांनी हजेरी लावली. पैकी १४७ कागदपत्रे आणि उंची, छातीच्या चाचणीत अपात्र ठरले.





प्रत्यक्षात ५९० उमेदवारांनी शारीरिक चाचणी दिली. या भरती प्रक्रियेत पहाटे पाच वाजता हजेरी घेतली जात आहे. त्यानंतर कागदपत्रे, छाती, उंची यांची चाचणी होते. त्यातून यशस्वी झालेल्या उमेदवारांना क्रमांक दिला जातो.त्यानंतर शंभर मीटर धावणे आणि गोळाफेकची चाचणी होते. पाच किलोमीटरसाठी मात्र कसबा बावडा ते शिये या रस्त्यावर चाचणी होते. यासाठी सुमारे दोनशेहून अधिक कर्मचारी तेथे तैनात आहेत. १६ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान ही भरती प्रक्रिया सुरू राहणार आहे.राज्य राखीव दलाचे पोलिस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया सुरू आहे. सहायक समादेशक ए. पी. लिपारे यांच्याकडून नियोजन केले जात आहे.

‘आरएफआयडी’ पद्धतीत काय आहे?

उमेदवार कागदपत्रे छाती, उंची या चाचणीतून यशस्वी झाल्यावर त्याला एक क्रमांक दिला जातो. तो क्रमांक त्याने छातीवर लावायचा आहे. या क्रमांकामध्येच एक ‘चीप’ असते. क्रमांक मिळाल्यावर सर्व प्रक्रिया ही नावाऐवजी क्रमांकावरूनच होते.धावण्याच्या चाचणीत त्याचे मिनिट-सेकंदसुद्धा मोजण्याचे काम चीपद्वारेच होते. त्यामुळे मानवी हस्तक्षेप होणार नाही, अशी दक्षता ‘आरएफआयडी’ (रेडिओ फ्रिक्वेन्सी आय डेंटीफिकेशन) पद्धतीत घेतली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने