उदयोन्मुख खेळाडूंना प्रेरणा देण्याचा प्रयत्न; सौरभ राव

पुणे : राज्यातील उदयोन्मुख खेळाडूंना अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरणा मिळावी, यासाठी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी-म्हाळुंगे येथे २ ते १२ जानेवारी दरम्यान महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन पाच जानेवारी रोजी होणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. येथील विधानभवन सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.






क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे सचिव नामदेव शिरगावकर, क्रीडा सहसंचालक चंद्रकांत कांबळे, उपसंचालक संजय सबनीस आदी या वेळी उपस्थित होते. राव म्हणाले, राज्य सरकार आणि महाराष्ट्र ऑलिंपिक संघटना यांच्या वतीने या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.स्पर्धेत १८ वर्षांवरील वयोगटातील खेळाडू सहभागी होणार आहेत. स्पर्धेच्या निमित्ताने राज्यातील खेळाडूंना अधिकाधिक स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. खेळाडूंमधील क्रीडा कौशल्य वाढीस लागण्यास मदत होईल.

स्पर्धेचे आयोजन राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये करण्यात येत असून, या स्पर्धेत ३९ क्रीडा प्रकारांचा समावेश आहे. राज्यातील १० हजार ४५६ खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक आणि व्यवस्थापक या स्पर्धेत सहभागी होत आहेत. या स्पर्धेसाठी राज्य सरकारने १९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पाच जानेवारीला श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे होणार आहे. या समारंभास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रीडामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार उपस्थित राहणार आहेत.दिवसे म्हणाले, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. अशा खेळाडूंच्या गुणवत्तेला स्पर्धेद्वारे चांगली संधी मिळेल. खेळाडूंची माहिती सॉफ्टवेअरद्वारे संकलित करण्यात येणार आहे. भविष्यात क्रीडा विकासाचे उपक्रम राबविताना याचा उपयोग होऊ शकेल.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने