शांतता राखण्याचीही क्षमता नाही; साबा कोरोसी

न्यूयॉर्क : ‘संयुक्त राष्ट्रांची सुरक्षा समिती ही सध्याचे जगाचे प्रतिनिधीत्व करत नाही. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा कायम राखण्याचे आपले मूलभूत कामही करण्याची या संस्थेकडे क्षमता उरलेली नाही,’ असा घरचा आहेर आज संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेचे अध्यक्ष साबा कोरोसी यांनी आज दिला आहे.सुरक्षा समितीचा एक सदस्य असलेला रशिया त्यांच्या शेजारी देशावर हल्ला करतो आणि सुरक्षा समिती काहीही करू शकत नाही, असा संताप कोरोसी यांनी ‘पीटीआय’शी बोलताना व्यक्त केला. हंगेरीचे राजनैतिक अधिकारी असलेले साबा कोरोसी हे संयुक्त राष्ट्रांच्या ७७ व्या आमसभेचे अध्यक्ष आहेत.

रशियाने युक्रेनवर हल्ला करून त्यांचे चार प्रदेश विलीन करून घेतले आहेत. त्याविरोधात सुरक्षा समितीमध्ये मांडलेल्या ठरावाविरोधात रशियाने व्हेटोचा वापर करून हा ठराव नामंजूर करवून घेतला होता. या परिस्थितीबाबत बोलताना कोरोसी म्हणाले की,‘‘संयुक्त राष्ट्रांमध्ये सुधारणा घडवून आणण्याची अनेक देशांची आग्रही मागणी आहे.आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता आणि सुरक्षा कायम ठेवण्यासाठी आणि संभाव्य युद्ध रोखण्यासाठी म्हणून अनेक वर्षांपूर्वी या संस्थेची स्थापना झाली होती. आता ही शक्तीशाली संघटना कमकुवत झाली आहे. सुरक्षा समितीच्याच एका कायमस्वरुपी सदस्याने शेजारील देशावर हल्ला करूनही त्याविरोधात सुरक्षा समिती काहीही करू शकत नाही. वास्तविक या संस्थेने कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे. हा भविष्यासाठी एक धडा असून संस्थात्मक रचनेत सुधारणा करण्याची संधी आहे.’’







आतापर्यंत एकदाच बदल

संयुक्त राष्ट्रांच्या ७७ वर्षांच्या इतिहासात, या संस्थेमध्ये फक्त एकदाच बदल झाला आहे. १९६३ मध्ये सुरक्षा समितीमधील सहा अस्थायी सदस्यांची संख्या वाढवून ती १० करण्यात आली आहे. सुरक्षा समितीच्या रचनेत बदल करण्याची भारताची आग्रही मागणी आहे.जागतिक परिस्थितीमध्ये प्रचंड बदल झाला असताना सुरक्षा समिती आता कालबाह्य ठरली आहे. तिला कालसुसंगत करण्यासाठी कायमस्वरुपी सदस्यांची संख्याही वाढवावी, अशी भारताची मागणी आहे. साबा कोरोसी यांनीही भारताचे महत्त्व वाढल्याचे सांगताना, ५० देशांचे प्रतिनिधीत्व करणारा आफ्रिका खंडही सुरक्षा समितीमध्ये नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

भारताकडून मोठ्या अपेक्षा : कोरोसी

दक्षिणेकडील देशांचा नेता म्हणून भारत पुढे येत असल्याचे निरीक्षण आमसभेचे अध्यक्ष साबा कोरोसी यांनी नोंदविले. कोरोसी हे सोमवारपासून तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. कोरोसी म्हणाले,‘‘जगामध्ये मोठे बदल घडवून आणण्याची गरज असल्याबाबत संयुक्त राष्ट्रे आणि भारत यांची वैचारिक भूमिका सारखीच आहे.मी भारत दौऱ्यावर मोठ्या अपेक्षेने जात आहे. जगाबरोबरच ‘यूएन’मध्ये बदल घडवून आणण्याच्या त्यांच्याविचारांशी आम्ही सहमत आहोत. हा बदल घडविण्याच्या प्रयत्नांत भारताचे सहकार्य मिळवावे, यासाठीच मी हा दौरा आखला आहे.’’ जगासमोर अनेक नव्या समस्या निर्माण होत असून त्यावर भारत उपायदेखील शोधत आहे. हे उपाय केवळ त्यांच्यासाठीच नसून इतरांसाठीही आहेत, असे कोरोसी यांनी नमूद केले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने