"हिंदूंचा हत्यारा, असा उल्लेख केलेल्यांना भाजपने पद्मविभूषण पुरस्कार दिला" ; ठाकरे गटाचा हल्लाबोल

मुंबई : माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार घोषित झाल्यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांचा बाजार उठला आहे. राजकीय नेते केंद्र सरकारवर टीका करत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला सवाल केला आहे.मुलायमसिंह यादव यांनी राम मंदिराबाबत घेतलेली भूमिका, त्यांनी कारसेवकांवर केलेला गोळीबार यावर आमचा आक्षेप आहे, असे राऊत म्हणाले.कारसेवकांवर गोळी झाडण्याचे काम मुलायमसिंह यादव यांनी केले. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद भाजपच्या या संघटनांनी मुलायमसिंह यांचा उल्लेख हत्यारा, असा केला होता. त्यांच्यावर हिंदूंच्या हत्येचा गुन्हा दाखल व्हायला पाहीजे, असे या संघटनांचे मते होती. मात्र केंद्र सरकारने त्यांचा गौरव केला. वीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुरस्कारासाठी का केला नाही, असा सवाल संजय राऊत यांनी केला. 



केंद्र सरकारने यंदाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. त्यात समाजवादी पक्षाचे दिवंगत संस्थापक मुलायमसिंह यादव आणि कर्नाटकचे नेते एस. एम. कृष्णा यांचा समावेश आहे. कर्नाटक, उत्तर प्रदेशातील महापालिका आणि पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दोन नेत्यांचा पद्म पुरस्कारांच्या यादीत समावेश करून सरकारने राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न केला आहे.कृष्णा हे कर्नाटकातील बहुसंख्य वोक्कालिगा समाजाचे नेते आहेत, तर मुलायम हे ओबीसींमध्ये देशातील सर्वात आदरणीय नेत्यांपैकी एक आहेत. याच वोक्कालिगा आणि ओबीसी मतदारांना भाजप आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने