'भाजपनं राज्याचं विधानभवन घाण केलंय, सत्तेत आल्यावर आम्ही गोमूत्रानं ते स्वच्छ करु'

बंगळुरु : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डीके शिवकुमार  यांनी कर्नाटकातील सत्ताधारी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. भाजपनं राज्य सचिवालय पूर्णपणे घाण केलं आहे. सत्तेत आल्यावर ते सचिवालय आम्ही गोमूत्रानं स्वच्छ करु, असा दावा डीकेंनी केलाय.सध्याच्या भाजप सरकारला सत्तेत राहण्यासाठी फक्त 40-45 दिवस उरले आहेत, त्यामुळं त्यांनी आता सामान बांधायला सुरुवात करावी. काँग्रेस पक्षाची  सत्ता आल्यावर प्रदेश सचिवालय डेटॉलनं स्वच्छ करु. शिवाय, गोमूत्रानंही सचिवालय स्वच्छ करण्यात येईल, असं डीकेंनी सांगितलंय.



डीके शिवकुमार यांनी राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि भाजपवर मागील काँग्रेस सरकारवर खोटे आरोप केल्याचा दावा केलाय. यापूर्वी भाजपनं काँग्रेसच्या सिद्धरामय्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत लोकायुक्तांकडं तक्रार केली आहे. सिद्धरामय्या सरकारच्या काळात 35 हजार कोटींच्या विकासकामांमध्ये आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप भाजपनं केला आहे.तर, दुसरीकडं काँग्रेसनं सत्ताधारी भाजपवर घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. कर्नाटकातील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दोन्ही पक्षांच्या कार्यकाळाची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोगाची मागणी केली आहे. कर्नाटकात यंदा विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्यामुळं आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने