क्रांतिकारक घोषणा होणार? शिवशक्ती-भिमशक्तीवर ठाकरे गटाच्या खासदाराचे मोठे वक्तव्य!

मुंबई: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचे दोन गट झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांची ही पहिली जयंती आहे. त्यामुळे ठाकरे गट आणि शिंदे गट वेगवेगळ्या प्रकारे बाळासाहेबांना अभिवादन करणार आहेत. तसेच ठाकरे गट आज शिवशक्ती आणि भिमशक्ती एकत्र येणार असल्याची घोषणा करु शकते. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. 



संजय राऊत म्हणाले "वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची आज संयुक्त पत्रकार परिषद आहे. नायगाव येथील आंबेडकर भवनात ही पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी क्रांतिकारक घोषणा होणार आहेत. युती संदर्भात मोठी घोषणा होणार आहे. बाबासाहेबांचे नातू आणि प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू एकत्र येणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सभा होईल तिथे उद्धव ठाकरे महाराष्ट्राला संबोधित करतील."शिवशक्ती-भिमशक्ती ही विचारांची युती आहे. या शक्तीसमोर कोणतीही महाशक्ती टिकाव धरु शकणार नाही. ह्या दोन शक्ती एकत्र याव्या हे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते, असे देखील संजय राऊत म्हणाले. 

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती वर संजय राऊत म्हणाले, "जिथे-जिथे मराठी माणूस पोहचला तेथे बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यात येते. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली नसती. शिवसेना हे चार अक्षर नसते तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तरुणांची जी गरम रक्तांची पिढी दिसते ती कधीच दिसली नसती."कितीही राजकारण झालं तरी बाळासाहेब हृदयावर अजरामर आहेत. शिवसेनेत कोणतेही गट नाहीत हे भाजपचे राजकारण आहे. बाळासाहेब ठाकरेंसोबत ही बेईमानी आहे," अशी टीका देखील संजय राऊत यांनी भाजपवर केली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने