आंबेडकरांचा अपमान; मुख्यमंत्र्यांनी भर अधिवेशनातून राज्यपालांना पळवून लावलं!

तमिळनाडू: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून गेल्या काही दिवसांमध्ये अनेकदा महापुरुषांचा अपमान झाला. त्याविरोधात वातावरणही तापलं, पण राज्यपालांवर कारवाई झाली नसल्याने नाराजीचा सूर आहे. अशातच आता तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.



नक्की झालं काय?

तमिळनाडूचे राज्यपाल आर एन रवी आणि मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यातल्या वादामुळे काल राज्यपालांनी अभिभाषण अर्ध्यावर सोडून सभात्याग केला. राज्यात प्रथमच अशी घटना घडली. तमिळनाडूमध्ये विधिमंडळाचे अधिवेशन आजपासून सुरू झालं. यामध्ये त्यांनी आपल्या लिखित भाषणातला काही भाग टाळला, ज्यामध्ये द्रविडीयन मॉडेलचा समावेश होता. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पेरियार यांचा उल्लेख टळला.अभिभाषणातल्या ज्या मुद्द्यांची शिफारस सरकार करेल, ते मुद्दे रेकॉर्डवर ठेवावे आणि राज्यपाल सभागृहाबाहेर जे बोलले ते रेकॉर्डवरुन वगळावे, असा ठराव स्टॅलिन यांनी मांडला जो मंजूरही झाला. मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर राज्यपाल नाराज होऊन बाहेर पडले.

घटनेचा व्हिडीओ व्हायरल; महाराष्ट्रासोबत तुलना

या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सर्वच युजर्सकडून स्टॅलिन यांच्या भूमिकेचं कौतुक केलं जात आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडूनही सातत्याने महापुरुषांचा अपमान करणारी विधानं केली जात आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात संतप्त वातावरण आहे. अशात त्यांच्यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याबद्दल नेटकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने