आमचं भविष्य सर्वात जास्त धोक्यात; शिखर परिषदेत असं का म्हणाले PM मोदी?

दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'व्हॉइस ऑफ ग्लोबल साउथ' शिखर परिषदेला आज संबोधित केलं. आम्ही नवीन वर्षात प्रवेश केला आहे. गेलं वर्ष युद्ध, संघर्ष, दहशतवाद आणि तणावपूर्ण होतं, असं ते म्हणाले.'व्हॉईस ऑफ ग्लोबल साउथ' शिखर परिषदेत पीएम मोदींनी इंधन आणि खतांच्या वाढत्या किमती, तसंच हवामान बदलावर चिंता व्यक्त केलीये. 'व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ' शिखर परिषदेला ऑनलाइन संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, 'सध्या जग संकटात आहे. आमचं (ग्लोबल साउथ) भविष्य सर्वात जास्त धोक्यात आहे. बहुतेक जागतिक आव्हानं 'ग्लोबल साउथ'मुळं उद्भवत नाहीत. परंतु, त्याचा सर्वात जास्त परिणाम आपल्यावर होतो.'



शिखर परिषदेत मोदी पुढं म्हणाले, भारतानं नेहमीच 'ग्लोबल साउथ'मधील आपल्या बांधवांशी आपला विकास अनुभव शेअर केला आहे. भारत या वर्षी G20 चं अध्यक्षपद भूषवत आहे. आमचं उद्दिष्ट 'ग्लोबल साउथ'चा आवाज बुलंद करणं हा आहे. युद्धे, संघर्ष, दहशतवाद आणि भू-राजकीय तणाव, अन्नधान्य, खत आणि इंधनाच्या वाढत्या किमतींमुळं आम्ही आणखी एक कठीण वर्ष मागं सोडलं आहे, असंही मोदी म्हणाले.परकीय राजवटीविरुद्धच्या लढ्यात आम्ही एकमेकांना साथ दिली आणि नागरिकांचं कल्याण केलं. जागतिक समस्या सोडवण्यासाठी संयुक्त राष्ट्रासारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांची मोठी भूमिका आहे. यामध्ये सुधारणा आणि प्रगतीचा समावेश केला पाहिजे, असंही मोदींनी स्पष्ट केलं.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने