आमचं सरकार व्होट बँकेच्या राजकारणासाठी नाही, तर विकासासाठी आहे - PM मोदी

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (गुरुवार) कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. यादरम्यान PM मोदी करोडो रुपयांचे प्रकल्प दोन्ही राज्यांना भेट देणार आहेत.मोदींनी कर्नाटकात 10,800 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली, तर महाराष्ट्रात 38,800 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार आहेत. याशिवाय, मुंबईतील मेट्रो रेल्वे मार्गाचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. 2015 मध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रो रेल्वे मार्गाची पायाभरणी करण्यात आली होती. याशिवाय, पंतप्रधानांचा मुंबईत रोड शो होणार आहे. यासोबतच ते बीकेसीतील एमएमआरडीए मैदानावर सभेला संबोधित करणार आहेत.



पंतप्रधान मोदींनी आज कर्नाटकातील यादगिरी जिल्ह्यात नारायणपूरमध्ये कालवा प्रकल्पाचं उद्घाटन आणि नूतनीकरण केलं. यावेळी संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले, 'आज मी कर्नाटकच्या विकासाशी संबंधित हजारो कोटींचे प्रकल्प तुमच्याकडं सुपूर्द करण्यासाठी आणि नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आलो आहे. सध्या पाणी आणि रस्त्यांशी संबंधित खूप मोठ्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन इथं झालं आहे.'मोदी पुढं म्हणाले, 'पुढील 25 वर्षे नवीन संकल्प पूर्ण करण्यासाठी देश पुढं जात आहे. ही 25 वर्षे देशातील प्रत्येक व्यक्तीसाठी अमृतकाळ आहे. प्रत्येक राज्यासाठी तो अमृतकाळ असणार आहे. या अमृतमहोत्सवात विकसित भारत घडवायचा आहे. 

भारताचा विकास तेव्हाच होऊ शकतो, जेव्हा देशातील प्रत्येक नागरिक, प्रत्येक कुटुंब, प्रत्येक राज्य या मोहिमेत सामील होईल. मागील सरकारनं मागास घोषित केलेल्या जिल्ह्यांमध्ये विकासाच्या आकांक्षेला आम्ही प्रोत्साहन दिलं आहे.'आमच्या सरकारनं यादगीरसह देशातील अशा 100 हून अधिक जिल्ह्यांमध्ये आकांक्षी जिल्हा कार्यक्रम सुरू केला. या जिल्ह्यांमध्ये सुशासनावर आम्ही भर दिला. विकासाच्या प्रत्येक स्तरावर काम सुरू केलं. भारताचा विकास करायचा असेल, तर सीमा सुरक्षा, किनारी सुरक्षा, अंतर्गत सुरक्षेप्रमाणंच जलसुरक्षेशी संबंधित आव्हानंही दूर करावी लागतील. त्यामुळंच आमचं सरकार व्होट बँकेच्या राजकारणासाठी नाही, तर विकासासाठी काम करत आहे, असंही मोदी म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने