दीड-दोनशे मतांसाठी शिवप्रेमींच्या भावना दुखवू नका

 कोल्हापूर : आमदार विनय कोरे यांनी १५०-२०० मतांसाठी शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे सरकार शिवभक्तांच्या मागे राहणार की १००-१५० मतदार असणाऱ्या अतिक्रमणधारकांसोबत राहणार आहे,असा जाब विचारत विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याचा निर्णय झाला असतानाही आमदार कोरे शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमींना विश्‍वासात न घेताच अतिक्रमणधारकांसोबत एकतर्फीच बैठक घेत होते. न्यायालयाने अतिक्रमणधारकांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी दहा दिवसांची मुदत दिली असताना ही बैठक बोलावलीच कशी, असाही सवाल शिवप्रेमींना केली.दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जाब विचारण्यासाठी मोठ्या संख्येने शिवप्रेमी एकत्र आले होते. दरम्यान, आजच्या बैठक़ीला आमदार कोरे उपस्थित राहणार नसल्याने ही बैठक रद्द करण्यात आली. मात्र, शिवप्रेमींना या एकतर्फी बैठकीचा तीव्र शब्दात निषेध केला.



हर्षेल सुर्वे म्हणाले, ‘‘जिल्हाधिकारी कार्यालयात चोरी-छुपे घेतली जाणारी बैठक ही शिवप्रेमींच्या दबावामुळे रद्द झाली. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अतिक्रमणाधारकांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेतो म्हणून सांगितले होते. त्यामुळे आम्ही शांत बसलो. पण शिवसैनिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहत असतील तर आम्ही गप्प बसणार नाही.’’संभाजी साळुंखे म्हणाले, ‘‘विशागड अतिक्रमणाबाबत आमदार विनय कोरे यांनी बैठक बोलावली होती. यामध्ये शिवप्रेमींशिवाय केवळ अतिक्रमणधारकांनाच बोलावले आहे. शिवभक्त स्वत: येथे आले आहेत. न्यायालयाच्या विरोधात जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होत असेल तर खपवून घेणार नाही.’’फत्तेसिंह सावंत म्हणाले, ‘‘स्थानिक लोकप्रतिनिधी केवळ मतांसाठी अशा बैठका घेत असतील तर हा शिवप्रेमींचा अपमान आहे. ही बैठक चोरून घेतली जात होती. वास्तविक विशाळगडावर गैरकृत्य होत असताना त्याकडे लक्ष दिले जात नाही. याउलट त्यांना पाठीशी घालण्याचे काम केले जात असल्याची टीकाही सावंत यांनी केली.’’

दिलीप देसाई म्हणाले, ‘‘यापूर्वी जिल्हाधिकारी रेखावार यांनी घेतलेल्या बैठकीत कोणताही भेदभाव नव्हता. कोणाचेही अतिक्रमण असेल तर त्यांनी तत्काळ काढून घ्यावे, असाच विषय होता. यावर अतिक्रमणधारकांनी न्यायालयात दावा दाखल केला. ११ जानेवारीला त्यांची याचिका फेटाळली आहे. २१ तारखेपर्यंत स्थगिती असताना बैठक का घेतली, असाही सवाल केला.’’ या वेळी अमित अडसुळे, प्रदीप हांडे, विजय दरवान, प्रज्वल गोडसे, संकेत खोत उपस्थित होते.आमदार विनय कोरे हे लोकप्रतिनिधी आहेत. ते प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आढावा घेऊ शकतात. दरम्यान, काही कारणास्तव ते आले नसल्यामुळे बैठक रद्द झाली.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने