महाराष्ट्रातील जर्मन शेतकऱ्याची यशोगाथा; अनोख्या प्रयोगाचं यशस्वी व्यवस्थापन

पुणे: आयुष्यात एवढं ध्येयवेडं असावं माणसाने... जर्मनीचं एक जोडपं भारतात आलं आणि पुण्यापासून ५० किलोमीटरच्या अंतरावर पडीक आणि डोंगरउतारावर असलेल्या माळरानावर जवळपास १२ ते १३ कोटी रूपये खर्चून एकात्मिक सेंद्रीय शेतीचं नंदनवन फुलवलं... एका शेतीमध्ये जवळपास ५० प्रकारचे प्रयोग केलेत यांनी. सात एकर शेतात तब्बल २४० प्रकारची ३५ हजार झाडे, सेंद्रीय पद्धत, शेतातील नैसर्गिक तळे, पाणी व्यवस्थापन, २६ कामगार, प्रत्येकाकडे वॉकीटॉकी आणि एकंदरीत शेती व्यवस्थापन पाहून डोकं सुन्न पडतं.जॉन मायकल आणि त्यांची बायको अंजी हे या प्रकल्पाचे जनक... अफाट प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व आहे दोघांचंही... व्यवहारिक आणि तेवढंच प्रॅक्टिकल... वेळेबाबत प्रचंड काटेकोर.ज्या लोकांनी आधी मेसेज किंवा फोन करून वेळ घेतली नव्हती त्यांचा प्रचंड राग येतो या व्यक्तीला. "हम कामवाले आदमी है... टाईम नही है हमारे पास... सो आने से पहले बता देने का" अशा सफाईदार हिंदी भाषेत समोरच्याला बोलतो हा अवलिया. जवळपास दोन अडीच तास चर्चा करूनही माणसाने स्वत:सोबत एकसुद्धा फोटो काढू दिला नाही हे विशेष.

जॉन मायकल आणि अंजी मायकल. हे दाम्पत्य मूळ जर्मनीचं. भारतात शेतीमध्ये काहीतरी नवा प्रयोग करण्याच्या हेतूने २०१९ साली पुण्यातील भोर तालुक्यातील कांबरे गावात डोंगर उतारावरील सात एकर जमीन खरेदी केली. यासाठी त्यांना अनेक परवानग्या मिळवाव्या लागल्या. शेतीला लागणाऱ्या पाण्याच्या नियोजनासाठी शेतातच छोटं तळं बांधलं, विहीर खोदली. पण हे पाणी शेतीला देण्यासाठी लाईटची गरज होती. लाईटचं कनेक्शन शेतापर्यंत आणण्यासाठी अनेक अडचणी आल्या पण हा माणूस थांबणारा नव्हता म्हणून परत एकदा सुरू झाला तो खडतर प्रवास...जमीन घेतली त्यावेळी तब्बल २० हजार झाडे आणि नंतरचे मिळून ३५ हजार झाडे यांनी शेतात लावली होती. डोंगरउतारावरील शेती असल्याने पाणी थांबायला मार्ग नव्हता. शेतात तळं बांधलं होतं पण ते पाणी शेताला देण्यासाठी लाईटची गरज होती. मग त्यांनी सामान वाहण्यासाठी उपयोगात असणाऱ्या कंटेनरपासून तयार केलेल्या घरावर सौरउर्जेच्या प्लेट टाकल्या आणि शेतासाठी आणि रोजच्या वापरासाठी लागणारी सगळीच वीज तयार केली. एवढंच नाही तर शेतीच्या उंचवट्यावर चार पाच ठिकाणी टाक्या तयार करून कोणत्याही प्रकारची उर्जा न वापरता शेतात पाणी देण्याचं तंत्र यांनी तयार केलंय. काम्बाफार्म असं या प्रकल्पाला नाव दिलंय.




शेतात लावलेली तब्बल ३५ हजार झाडे फक्त सेंद्रीय पद्धतीने वाढवले जातात. वेगवेगळ्या प्रकारे जीवामृत तयार करून झाडांना दिलं जातं. शेतातील झाडांच्या पानांचा आणि गवताचा वापर करून केलेलं मल्चिंग पाहून थक्क व्हायला होतं. शेतातील झाडाची एक काडीही इथे वाया जात नाही हे विशेष. लाकडाचे तुकडे करून ते पुन्हा शेतात टाकले जातात. लाकडाच्या भुशामुळे शेतीला आवश्यक ते मुलद्रव्ये मिळतातंच पण गवताच्या अच्छादनामुळे शेतीची धूप थांबते, शेतीला पाणीही कमी लागते आणि तणही होत नाही. कोणत्याही प्रकारच्या केमिकलचा वापर केला जात नसल्याने इथे जैवविविधता पाहायला मिळते. जवळपास ४० पेक्षा जास्त प्रकारचे पक्षी आणि नाना प्रकारच्या सापांचा वावर या शेतात आहे.मियावाकी आणि Syntropic शेतीचा एक यशस्वी प्रयोग आहे हा. बांबू, साग, ऑस्ट्रेलियन साग, निलगिरी, आंबा, करंज, वड, पिंपळ, अर्जुन, केळी, अननस, फणस, पपई, फुलझाडे, शेवरी, बाभूळ अशी जवळपास २४० प्रकारचे झाडं इथे आहेत. झाडांच्या वाढीसाठी केली जाणारी कटिंग आणि सपोर्ट प्लॅटिंगचं तंत्र वाखाणण्याजोगं आहे. एवढी झाडे असतानाही प्रत्येक झाडाकडे कामगारांचं लक्ष असतं हे विशेष.या ठिकाणी रोज २६ लोकं काम करतात. वेळेवर कामावर येणे आणि वेळेवर जाणे हा इथला नियम. ५ मिनीटेही लेट झालेलं जॉन आणि अंजी यांना चालत नाही. प्रत्येक कामगाराकडे एक वॉकीटॉकी दिलेला आहे. शेतात कुठेही असलेल्या कामगाराला देण्यात येणाऱ्या सूचना आणि एका क्षणात होणारं काम पाहून डोकं सुन्न होतं.

या दाम्पत्याने आत्तापर्यंत या प्रयोगासाठी कोट्यावधी रूपये खर्च केलाय. जॉन शेतीच्या इन्फ्रास्ट्रक्चरचं काम बघतात आणि अंजी या झाडांची लागवड आणि वाढीचं नियोजन सांभाळतात. हे दोघं एवढे ध्येयवेडे आहेत की जॉन हे एक दिवससुद्धा आपली शेती सोडून बाहेर जात नाहीत. या सात एकरात एवढे प्रयोग करूनही त्यांनी अजून ३ एकर जमीन भाड्याने घेतलीय. यामध्येही ते हाच प्रयोग राबवणार आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये स्थानिक शेतकरी आडकाठी आणतात पण मी थांबणार नाही असं ते सांगतात. त्यांना इथे परवानगी मिळवण्यासाठी सर्वाधिक खर्च आल्याचं ते सांगतात. एवढं करूनही त्यांचा भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी संघर्ष अजूनही सुरूच आहे.हे शेतीतलं काटेकोरपणे नियोजन आणि पारंपारिक शेती करण्याच्या प्रवाहात एक आधुनिकता आणि वेगळ्या प्रयोगाची झालर घातलेला शेतीचा यशस्वी प्रयोग प्रत्येकाने (शेतीमध्ये आवड नसणाऱ्यानेही) पाहायला हवा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने