‘महाराष्ट्र केसरी’त बक्षिसांचा वर्षाव! राज्यातून ९०० पेक्षा अधिक पैलवान

पुणे: महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची सुरुवात मंगळवार १० जानेवारीपासून होणार आहे. राज्यातील ४५ तालीम संघातील विविध १८ वजनी गटात सुमारे ९०० पेक्षा अधिक पैलवान या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.या स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ऑलिंपिक पदक विजेता कुस्तीगीर योगेश्वर दत्त यांच्या हस्ते मंगळवारी (दि. १०) सायंकाळी ६ वाजता होणार आहे.






या स्पर्धेतील विजेत्याला महिंद्रा थार जीप आणि रोख पाच लाखांचे बक्षीस, तर उपविजेत्याला ट्रॅक्टर आणि रोख अडीच लाखांचे बक्षीस मिळाणार आहे, अशी माहिती स्पर्धेचे संयोजक मुरलीधर मोहोळ यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेतल्यावर मोहोळ यांनी वरील माहिती दिली.बक्षिस रकमेची माहिती सकाळ वृत्तपत्राने १ जानेवारीच्या अंकात दिली होती, याला मुरलीधर मोहोळ यांनी आज दुजोरा दिला. मोहोळ यांच्या या पाहणी दौऱ्यावेळी पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीप भोंडवे, पुणे राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष योगेश दोडके, चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे, पुणे शहर राष्ट्रीय तालीम संघाचे विश्वस्त तात्यासाहेब भिंताडे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष विलास कथुरे यांच्यासह संयोजन समितीचे व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

कोथरूड येथील कुस्तीमहर्षी स्वर्गीय मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत ही स्पर्धा होणार आहे. त्यात ८० हजार आसनक्षमतेचे मैदान, दोन माती व तीन गादीचे आखाडे आहेत. प्रत्येक वजनी गटातील विजेत्यांना ‘येजडी जावा’ ही मोटारसायकल व रोख बक्षीस दिले जाणार आहे. उपविजेत्यांनाही बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी उपांत्य व अंतिम लढतीची चुरस पाहायला मिळणार आहे. समारोपाच्या दिवशी शनिवारी (दि. १४) सायंकाळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय कुस्ती संघांचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण सिंग, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र केसरी’च्या विजेत्याला गौरवण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने