इचलकरंजीत पंचगंगेत सापडले,आधारकार्डांनी भरलेले पोते बनावटगिरी झाल्याचा संशय

कोल्हापूर: येथील पंचगंगा नदीपात्रात चक्क हजारो आधारकार्डांनी भरलेले पोते फेकल्याचे आढळून आले. स्वच्छता करणाऱ्या राष्ट्रसेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी हे पोते बाहेर काढले व तत्काळ शिवाजीनगर पोलिसांना पाचारण केले.यातील सर्व आधारकार्ड इचलकरंजी शहरातील नागरिकांची असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वी रेशनकार्डांचा, तर आता आधारकार्डांचा ढीग सापडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

प्रत्येक नागरिकाची ओळख ठरविणाऱ्या आधारकार्डांची वितरण प्रणाली किती ढिसाळ आहे, याचा प्रत्यय रविवारी (ता. १२) सकाळी पंचगंगा नदीपात्रात बघावयास मिळाला. प्रत्येक रविवारी पंचगंगा पात्राची स्वच्छता राष्ट्रसेवा दलाचे कार्यकर्ते करीत असतात.आज त्यांना नदीपात्रात पोते तरंगताना आढळून आले. ते जीर्ण झालेल्या आधारकार्डांनी भरलेले होते. याची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र देशमुख यांनी पाहणी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. ही आधारकार्ड बाहेर काढल्यानंतर सर्व ‘ओरिजनल’ असल्याचे समजते. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला.



प्राथमिक माहितीनुसार, आढळलेली सर्व आधार कार्ड शहरातील कबनूर, जवाहरनगर, कोरोची, भोनेमाळ या भागातील आहेत. ही सर्व कार्ड बाहेर काढून घाटावर पसरण्यात आली. या कार्डांवरून पोलिस व सेवा दलाच्या कार्यकर्त्यांनी संबंधितांना संपर्क साधला.त्यावेळी अनेकांनी आमचे आधारकार्ड घरीच असल्याचे सांगितले. यातून बनावट आधारकार्ड तयार करणाऱ्यांची काही नावेही समोर आली आहेत. पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू केली आहे. याचा अहवाल तहसीलदारांना पाठविण्यात येणार आहे.

पेन्शनसाठी बनावट कार्डांची शक्यता

आधार कार्डवरील बहुतांश नागरिकांचे वय हे साधारण ६० ते ६५ वर्षांपर्यंत आहे. पेन्शन मंजुरीच्या हेतूने आधार कार्डांवरील वय वाढवण्याचे प्रकार यापूर्वी शहरात उघडकीस आले आहेत. त्यामुळे पेन्शनसाठी बनावट आधारकार्ड केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यादृष्टीने तपास सुरू केला असून, मोठे रॅकेट उजेडात येऊ शकते.रेशनकार्डानंतर आता आधारकार्ड दोन महिन्यांपूर्वी रुग्गे मळा भागात हनुमान मंदिर परिसराची स्वच्छता करताना कचऱ्यात रेशनकार्डांचा ढीग सापडला होता. आता पुन्हा थेट नदीत पोत्यात भरून हजारो आधारकार्ड टाकल्याचे समोर आले आहे. या बनावटगिरीला वेळीच अटकाव घालण्यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना राबवण्याची गरज आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने