हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ! ईडीनंतर आता 'या' प्रकरणात गुन्हा दाखल

कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांची 40 कोटींची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली कागल तालुक्यामध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे. सुडबुद्धीतून गुन्हा दाखल केल्याचा आरोप मुश्रीफ यांच्या समर्थकांनी केला आहे. तर या षडयंत्रामुळे कोल्हापुरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची राहिल असा इशाराही मुश्रीफ यांच्या समर्थकांनी दिला आहे.भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक घोटाळ्याचे आरोप केले. तेव्हा कागलमधील काही शेतकऱ्यांनी हसन मुश्रीफ यांनी आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार किरीट सोमय्यांकडे केली होती. त्यानंतर मुश्रीफांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






तर किरीट सोमय्या यांनी मुश्रीफ यांच्यावर शेल कंपन्या तयार करुन कोट्यवधींची संपत्ती जमवल्याचा पहिला आरोप केला होता. त्यानंतर कागल येथील सर सेनापती साखर कारखान्यामध्येही घोटाळा केल्याचा आरोप करत सोमय्यांनी ईडीकडे काही कागदपत्र दिली. त्यानंतर अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याशी संबंधित घोटाळ्याचा तिसरा आरोपही सोमय्यांनी केला होता. हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांनी बोगस कंपन्यांद्वारे पैसा वळवल्याचा सोमय्यांचा आरोप आहे. त्यानंतर मुश्रीफ यांच्या घरासह, ऑफिस, नातेवाईक आणि मुलीच्या घरीही ईडीने छापेमारी केली होती.राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर आणि ऑफिसवर काही दिवसांपूर्वी ईडीने धाड टाकली होती. पहाटेपासून ईडीने धाड टाकण्यास सुरवात केली होती. कागल येथील घरी ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली होती.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने