राज्यभरातील दहा लाख विद्यार्थी येणार

कोल्हापूर: कणेरीच्या सिद्घगिरी मठावर पर्यावरण जागृतीसाठी २० फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या पंचमहाभूत सुमंगल लोकोत्सवात राज्यभरातील सुमारे दहा लाख विद्यार्थी भेट देणार आहेत. यात आठवी, नववी व अकरावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी भाग घ्यावा, असे नियोजन राज्याच्या शिक्षण विभागाने केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून रोज एक-दोन तालुक्यांतील विद्यार्थी येतील. या सर्व विद्यार्थ्यांची जेवणाची सोय मठावर केली आहे.दरम्यान, देशाच्या विविध प्रांतांतील लोककला, लोकसंस्कृती यांसह सात दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणीच या लोकोत्सवातून उपस्थितांना मिळणार आहे. हजारो कलावंत यामध्ये सहभागी होणार असून, रोज सायंकाळी भव्य सभामंडपात हे कार्यक्रम पाहायला मिळतील. याशिवाय काही व्यासपीठावर दिवसभर देशाच्या विविध राज्यांतून आलेले कलाकार आपली कला सादर करणार आहेत.



सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्रातील अनेक लोककला सादर होणार आहेत. त्यामध्ये जागर लोककलेचा, महाराष्ट्राची लोकधारा, वाद्य महोत्सव, वाद्य जुगलबंदी आणि लोकनृत्य, शिवराष्ट्र, शिवगर्जना अशा अनेक कार्यक्रमांचा समावेश आहे. याशिवाय केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, राजस्थान, आसाम, गुजरात यांसह अनेक राज्यांतील लोककलांचा समावेश आहे. रोज सायंकाळी पाचनंतर हे कार्यक्रम होतील. याशिवाय काही मुक्त व्यासपीठ उभारले आहेत. तेथे दिवसभर कलावंत आपली कला सादर करणार आहेत. या निमित्ताने देशाच्या सांस्कृतिक ऐक्याचे दर्शन मठावर घडविण्यात येणार आहे.

कार्यक्रम असे

२० फेब्रुवारी- जागर लोककलेचा (सहभाग- गणेश चंदनशिवे, ऊर्मिला धनगर, देवानंद माळी, मीरा उमप, कडूबाई खरात).

२१ फेब्रुवारी- महाराष्ट्राची लोकधारा (सहभाग- कृष्णा कदम व त्यांचे सहकारी).

२२ फेब्रुवारी- वाद्य महोत्सव (सहभाग- संदीप पाटील आणि दुर्मिळ वाद्य वाजविणारे कलाकार).

२३ फेब्रुवारी- वाद्य जुगलबंदी आणि लोकनृत्ये (सहभाग- उदय साटम व सहकारी).

२४ फेब्रुवारी- शिव महाराष्ट्र (सहभाग- अमेय पाटील व त्यांचे सहकारी).

२५ व २६ फेब्रुवारी- शिवगर्जना.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने