बारावीची उद्यापासून परीक्षा; परीक्षेविषयी हे माहिती असू द्या...

नाशिक : बारावीच्‍या लेखी परीक्षेला मंगळवारपासून (ता.२१) सुरवात होणार आहे. पहिला पेपर इंग्रजी विषयाचा असून, त्‍यानंतर अन्‍य विषयांचे पेपर घेतले जातील. २१ मार्चपर्यंत चालणाऱ्या या परीक्षेत कला, वाणिज्‍य व विज्ञान शाखेतून नाशिक विभागातून एक लाख ६२ हजार ६१२ विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत.कोरोनानंतर परिस्‍थिती पूर्वपदावर आलेली असल्याने अगदी पूर्वीप्रमाणे परीक्षांचे संयोजन केले जाते आहे. परीक्षा प्रक्रियेत काही बदल करण्यात आले असून, याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयाच्‍या माध्यमातून कळविण्यात आलेली आहे. प्रारंभी भाषाविषयक व त्‍यानंतर शाखानिहाय परीक्षा पार पडणार आहे. 

आजच परीक्षाकेंद्राला भेट द्या

परीक्षेच्‍या दिवशी धावपळ करावी लागू नये, तारांबळ उडू नये याकरीता परीक्षेच्‍या एक दिवस आधी उद्या (ता.२०) परीक्षा केंद्राला भेट देणे सोयीचे ठरू शकते. घरापासून केंद्रापर्यंत जाण्याचे नियोजन आखण्यासाठी मदत होणार असून, विद्यार्थ्यांची दगदग टळू शकणार आहे.




परीक्षेविषयी हे माहिती असू द्या...

* पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित परीक्षेचे आयोजन

* सवलतीचा अतिरिक्‍त वेळ यंदाच्‍या वर्षी नाही.

* प्रश्‍नपत्रिका दहा मिनिटांपूर्वी न देता, वेळेवरच दिली जाईल

* परीक्षा वेळेनंतर अतिरिक्‍त दहा मिनिटे दिला जाईल वेळ

* वेगवेगळ्या पथकांची असेल परीक्षा केंद्रांवर नजर

* अतिसंवेदनशील केंद्रांवर तैणात असेल पोलिस बंदोबस्‍त

* कॉपीमुक्‍त परीक्षा अभियान राबविण्याच्‍या आहेत सूचना

विद्यार्थ्यांनो, हे लक्षात असू द्या..

* परीक्षेला जातांना काळजीने हॉलतिकीट व शैक्षणिक साहित्‍य घ्या.

* अवघड प्रश्‍नांनी गोंधळू न जाता, उत्तरे माहित असलेले प्रश्‍न आधी सोडवा.

* गैरप्रकारांना बळी पडू नका, परीक्षा केंद्रावर शिस्‍तीचे पालन करा.

* झालेल्‍या पेपरविषयी चर्चा करण्याचे टाळा.

* पुरेशी झोप घ्या, शक्‍यतो मोबाईल-टीव्‍हीचा वापर टाळा.

तणाव जाणवल्‍यास यांना करा संपर्क

शिक्षण मंडळातर्फे समुपदेशन सुविधा उपलब्‍ध करुन दिलेली आहे. परीक्षा कालावधीत ताण-तणाव जाणवल्‍यास विद्यार्थ्यांना समुपदेशकांना संपर्क साधून सहाय्यता घेता येणार आहे. त्‍यासाठी जिल्‍हानिहाय समुपदेशकांचे संपर्क क्रमांक जारी केलेले आहे.

नाशिक जिल्‍हा- किरण बावा (९४२३१८४१४१/९४२३०२६३०२), अरुण जायभावे (८६६८५७९०९७/९६५७५०१७७३), धुळे जिल्‍हा नंदकिशोर बागुल (९४२०८५२५३१), ज्ञानेश्‍वर पाटील (९८३४६४१९०१, ९६८९०९७०१६). जळगाव जिल्‍हा- बापू साळुंखे (९४२१५२११५६) सुरेश सुरवाडे (७२१८२१४४७७), नंदुरबार जिल्‍हा- राजेंद्र माळी (९४०४७४९८००), अशोक महाले (९४२१६१८१३०) यांच्‍याशी संपर्क साधता येईल.

नाशिक विभागातील स्‍थिती

जिल्‍हा विद्यार्थी संख्या

नाशिक ७४ हजार ७८०

धुळे २३ हजार ८७९

जळगाव ४७ हजार २१४

नंदुरबार १६ हजार ७३९

एकूण १ लाख ६२ हजार ६१२

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने