टॅक्सी हेल्पलाईन गुगलवरून शोधताहेत? सावधान! खात्री करा, अन्यथा बसू शकतो आर्थिक फटका..

नवी मुंबई :  ओला, उबेर किंवा अन्य प्रवासी सेवा देणाऱ्या टॅक्सी सेवेबाबत समस्या निर्माण झाली की आपण गुगलवरून हेल्पलाईन क्रमांक शोधून व्यथा मांडतो. मात्र हेल्पलाईन क्रमांक खरा की खोटा याची खात्री करा, अन्यथा तिथे कुठलाही आर्थिक व्यवहार करणे महागात पडू शकते. असाच एक प्रकार नवी मुंबईत समोर आला असून, यात एका महिलेची एक लाख ३ हजार ९९९ रुपयांची फसवणूक झाली आहे.

फिर्यादी महिला कोपरखैरणे येथे राहाते. २९ जानेवारीला त्या फिरण्यासाठी म्हणून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात गेल्या होत्या. यासाठी त्यांनी ओला बुक केली होती. त्याचे ८१९ रुपये भाडे झाले. ते त्यांनी ऑनलाईन मोबाईलद्वारे दिले. मात्र काही तांत्रिक बिघाड झाला आणि ते पैसे ओला चालकाच्या खात्यात जमा न झाल्याने त्यांनी पुन्हा एकदा पैसे पाठवले. मात्र काही वेळाने त्यांच्या बँकेतून दोन संदेश आले ज्यात दोनवेळा ८१९ रुपये खात्यातून वजा झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी ज्या ओलामधून प्रवास केला त्याच्या चालकाला फोन करून विचारणा केली त्यावेळी त्याने हेल्पलाईन क्रमांकावर फोन करण्यास सांगितले.



 त्यामुळे सदर महिलेने ओलाच्या अ‍ॅपमधील हेल्पलाईनला फोन केला, मात्र बराच वेळ झाला तरी तो बिझी असल्याने शेवटी त्यांनी गुगलवरून ओलाचा हेल्पलाईन क्रमांक शोधून त्यावर फोन केला असता तेथे बोलणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे नाव आशुतोष, असे सांगितले. तसेच त्याने एनीडेस्क अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगत त्याद्वारे फिर्यादी यांच्या मोबाईलचा ताबा घेतला व काही वेळातच फिर्यादी यांच्या खात्यातून एक लाख ३ हजार ९९९ रुपये वजा होत अन्य खात्यात जमा झाले. याबाबत पुन्हा फोन केला असता रिफंड होतील, असे त्यांनी सांगितले, मात्र रिफंड अद्याप झाले नाहीत.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांशी संपर्क केला. या व्यवहाराचा तपास करीत याबाबत सोमवारी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने