भारताची पदक विजेती बॅडमिंटनपटू तानियावर हिजाबची सक्ती

इराण: इराणमध्ये महिलांच्या हक्कांविषयी आक्रमक आणि हिंसक आंदोलने होऊनही इराणच्या प्रशासनावर काही फरक पडलेला दिसत नाहीये. इराण आंतरराष्ट्रीय चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेत जगभरातील अव्वल बॅडमिंटनपटूंनी सहभाग नोंदवला होता. भारताची महिला बॅडमिंटनपटू तानिया हेमंतने या दिग्गजाना पराभवाची धूळ चारत विजेतेपद पटकावले.मात्र पदक घेण्यासाठी ज्यावेळी कर्नाटकची तानिया पोडियमकडे गेली त्यावेळी तिला हिजाब घालावा लागला. त्यानंतरच तिला पदक मिळाले. तानियाने तेहरानमध्ये इराण फज्र इंटरनॅशनल स्पर्धेत महिला एकेरीत विजेतेपद पटकावले.






प्रकाश पादुकोण बॅडमिंटन अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या तानियाने गोल्ड मेडल जिंकल्यानंतर ती पदक घेण्यासाठी पोडियमकडे जात होती. त्यावेळी तिला हिजाब घालावा लागला. 19 वर्षाच्या तानियाने गतविजेत्या तमनीम मीरला पराभूत केले. तानियाने पहिला गेम 21 - 7 असा सहज जिंकला. मात्र दुसऱ्या गेममध्ये तानियाला भारताच्याच गुजरातमधील बॅटमिंटनपटू तसनीमने चांगलीच झुंज दिली. मात्र तानियाने 21 - 11 असा जिंकत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.इराणमध्ये महिला बॅडमिंटनपटूंना सामन्यादरम्यान हिजाब घालण्याची सक्ती करण्यात आली नव्हती. त्यांना लेगिन्स देखील घालण्याची सक्ती नव्हती. मात्र महिलांचा सामना सुरू असताना कोणत्याही पुरूषाला सामना पाहण्याची परवानगी नव्हती.

एन्ट्री गेटवर कोणत्याही पुरूषाला स्टेडियममध्ये येण्याची परवानगी नाही असा बोर्डच लिहिला होता. इतकंच काय तर खेळाडूंच्या आई वडिलांना आणि प्रशिक्षकांना देखील थांबवण्यात आले होते. विशेष म्हणजे या स्पर्धेत मिश्र दुहेरीत जगभरातील 10 जोड्या देखील सामील झाल्या होत्या.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महिलांचे सामने हे सकाळी आणि पुरूषांचे सामने हे दुपारी झाली. महिला प्रेक्षकांनाच महिलांचे सामने पाहण्याची परवानगी होती. महिलांच्या सामन्यावेळी सगळे सामनधिकारी महिलाच होत्या. जे पुरूष पालक आपल्या मुलीला खेळताना पाहण्यासाठी आले होते. त्यांनाही सामना पाहण्याची परवानगी देण्यात आली नाही. फक्त मिश्र दुहेरीच्या सामन्यातच पुरूष महिला एकत्र दिसले तेही बॅडमिंटन कोर्टवर!

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने