जागतिक मंदी नव्हे तर, 'या' कारणामुळे इन्फोसिसने दिला ६०० कर्मचाऱ्यांना नारळ

मुंबई: एकीकडे जागतिक मंदीचे सावट घोंगावत असताना अनेक दिग्गज कंपन्या कर्मचारी कपातीची घोषणा करत आहेत.मात्र, भारतातील आघाडीची आयटी कंपनी इन्फोसिसने मंदीमुळे नाही तर, चक्क अंतर्गत मुल्यमापन परीक्षेत नापास झालेल्या तब्बल ६०० कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे.गेल्या महिन्यात विप्रोने ४०० हून अधिक कर्मचाऱ्यांना अंतर्गत मुल्यमापन परीक्षेत नापास झाल्यामुळे कामावरून काढून टाकले होते. त्यानंतर आता इन्फोसिसनेदेखील विप्रोच्या पावलावर पाउल ठेवत ६०० कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे.ऑगस्ट 2022 मध्ये इन्फोसिसमध्ये रुजू झालेल्या एका कर्मचाऱ्याने सांगितले की, तो ऑगस्टमध्ये कंपनीत रुजू झाला होता. त्यानंतर कंपनीकडून सॅपचे प्रशिक्षण देण्यात आले. यात १५० पैकी ६० कर्मचारी उतीर्ण झाले होते. तर, अनुतीर्ण झालेल्या ८५ जणांना दोन आठवड्यांपूर्वी कामावरून काढून टाकण्यात आले.



दरम्यान, कंपनीच्या अंतर्गत मुल्यमापन परीक्षेत फेल झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना नेहमीच काढून टाकले जाते, असे कंपनीच्या एका प्रतिनिधीने सांगितले.याशिवाय जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर मायक्रोसॉफ्टपासून ते अॅमेझॉन आणि गोल्डमन सॅक्सपर्यंत अमेरिकन कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.अलीकडेच मायक्रोसॉफ्टने १०,००० कर्मचार्‍यांना काढून टाकण्याची घोषणा केली आहे, तर गुगलची पॅरेंट कंपनी असलेल्या अल्फाबेटने १२,००० कर्मचार्‍यांना कमी केले आहे. जागतिक मंदीचा सर्वाधिक फटका टेक कंपन्यांना बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने