त्यांना मी तुम्हा सर्वांमध्ये पाठवतेय, आता...; किडनी देणाऱ्या लेकीची भावनिक पोस्ट

नवी दिल्ली : राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) अध्यक्ष लालू यादव आज सिंगापूरहून भारतात परतत आहेत. खुद्द लालू यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. यावेळी त्यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली.रोहिणी यांनी ट्विट करून म्हटलं की, "मला तुम्हा सर्वांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचे नेते आदरणीय लालूजींच्या तब्येतीची. 11 फेब्रुवारीला वडील सिंगापूरहून भारतात जाणार आहेत. मी, एक मुलगी म्हणून माझे कर्तव्य बजावले आहे. माझ्या वडिलांना निरोगी करून मी त्यांना तुम्हा सर्वांमध्ये पाठवत आहे. आता तुम्हीच लोक माझ्या वडिलांची काळजी घ्या, अस आवाहनही रोहिणी यांनी केलं.



5 डिसेंबर 2022 रोजी सिंगापूरमध्ये लालू यादव यांचे किडनी प्रत्यारोपण करण्यात आले होते. त्यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी वडिलांना किडनी दान केली आहे. लालूंच्या सात मुली आणि दोन मुलांपैकी रोहिणी दुसऱ्या क्रमांकांच्या मुलगी आहे.लालू यादव यांना किडनी दिल्यानंतर रोहिणी म्हणाल्या होत्या की, माझ्या मृत्यूनंतर माझे अवयव दान करायचे मी ठरवले होतेच. दान ही वाईट गोष्ट नाही. मरणानंतरही तुम्ही लोकांना जीवदान देऊन जावू शकता. मी आता दान केलं आहे. शिवाय मानवी तस्करी होते, निष्पाप मुले-मुली मारल्या जातात, अवयव काढून विकले जातात. हे सर्व थांबले पाहिजे. दानापेक्षा मोठे पुण्य नाही. तुम्ही कितीही अभ्यास केला तरी आई-वडिलांची सेवा केली नाही तर तुम्ही चांगले नागरिक कसे बनणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने