क्रिकेट अकादमीने नाकारला होता प्रवेश; आता ती खेळतेय आंतरराष्ट्रीय क्रिकेट

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची खेळाडू शेफाली वर्माने वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी क्रिकेटमध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. अलीकडेच, शेफालीने महिला प्रीमियर लीग मेगा लिलावातही वर्चस्व गाजवले. या लिलावात एकूण ८६ खेळाडूंची विक्री झाली असून त्यात ३० परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. आपल्या नेतृत्वाखाली भारताला अंडर-19 विश्वचषक जिंकून देणारी तेजस्वी फलंदाज शेफाली वर्मा हिला महिला प्रीमियर लीग लिलावात दिल्ली कॅपिटल्सने २ कोटी रुपयांना विकत घेतले.शेफालीची मूळ किंमत ५० लाख रुपये होती. पण इथपर्यंत पोहोचण्याचा तिचा प्रवास कसा होता माहितीये का ?

शेफाली वर्माचा जन्म २८ फेब्रुवारी २००४ रोजी हरियाणातील रोहतक येथे झाला. तिला लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याची खूप आवड होती.शेफालीच्या वडिलांनाही क्रिकेट खेळण्याची आवड होती. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचे त्यांचे स्वप्न होते पण ते आपले स्वप्न पूर्ण करू शकले नाहीत.शेफालीलाही क्रिकेट खेळण्याची आवड असल्याचे समजल्यानंतर त्यांनी तिला घरीच प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.शेफालीने व्यावसायिक प्रशिक्षण घ्यावे अशी तिच्या वडिलांची इच्छा होती, म्हणून त्यांना शेफालीला क्रिकेट अकादमीत प्रवेश मिळवून द्यायचा होता. ती मुलगी असल्याने तिला कुठेच प्रवेश मिळाला नाही.



शेफालीला क्रिकेट शिकवण्यासाठी तिच्या वडिलांनी वयाच्या ९व्या वर्षी तिचे केसही कापले होते. केस कापल्यानंतर शेफाली मुलासारखी दिसू लागली, हेअरकट केल्यानंतर तिला अॅकॅडमीत प्रवेश मिळाला.जेव्हा शेफालीने केस कापले तेव्हा तिचे नातेवाईक आणि आजूबाजूच्या सोसायटीत राहणारे लोक अनेक कमेंट करायचे, पण शेफालीने या सगळ्या गोष्टी मागे टाकून तिची स्वप्ने पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित केले.भारतात महिला क्रिकेट अकादमीची स्थापना झाल्यानंतर शेफालीला महिला क्रिकेट अकादमीमध्ये प्रवेश मिळाला आणि पूर्ण मेहनत घेऊन शेफालीने व्यावसायिक प्रशिक्षण घेतले आणि त्यानंतर ती एक महान क्रिकेटर बनली.

शेफालीने २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि इतक्या लहान वयात महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघात पदार्पण करणारी ती भारतातील पहिली महिला खेळाडू ठरली आहे.याशिवाय शेफालीने महिला टी-२० चॅलेंजमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रम केला आणि इतिहास रचला. शेफाली पदार्पणाच्या कसोटीच्या दोन्ही डावांत ५० किंवा त्याहून अधिक धावा करणारी भारताची पहिली आणि जगातील चौथी महिला क्रिकेटपटू ठरली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने