पोटचं लेकरू गेल्यानंतर नवऱ्याला धीर देणारी माऊली; भीमरावांची रमाई

मुंबई: आज रमाई बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. रमाई यांचा जन्म दाभोळ जवळील वनंद गावी झाला. आई रुक्मिणी आणि वडील भिकु धोत्रेयांना ३ मुली आणि १ मुलगा होता. मोठी मुलगी विवाहित होती. वडील काबाड कष्ट करून दाभोळ बंद रात माशांच्या टोपली वाहन्याचे काम करायचे. आई गोव-या बनवायची, स्वयंपकासाठी इंधन आणायची.गोव-या बनवणे बिनभांडवली व्यवसाय आहे. संसारात चांगलेवाईट दिवस येतात म्हणून रमाईला आईने गोव-या बनवायला शिकविलेले होते. घरी गरीबी होती. अगदी बाल वयातच आई-वडिलांच्या मृत्यूनंतर आपले लहान बहिण भाऊ गौरी आणि शंकर यांची जबाबदारी घेणारी कणखर बहिण पाहताना ती बाल वयातच आई झालेली दिसते. आई बापाचे छत्र हरवलेली मुंबईला मामाकडे राहिलेल्या मुलीला एक शिकलेला मुलगा पाहायला येतो. त्याच्याशी लग्न होते त्यानतंर तीचा प्रवास म्हणजे ध्येय वेड्या माणसाला साथ कशी द्यायची याचे कृतीतून समाजाला दिलेले उत्तर म्हणजे रमाई बाबासाहेब आंबेडकर. 

साधी सोज्वळ, हजरजवाबी , सहनशील, धैर्यवान, स्वाभिमानी, प्रामाणिकपणा ठायी ठायी रुजलेला, उत्तम सहचारिणी ,हळवी, उच्च शिक्षि त नव-यासोबत संवादी असणारे व्यक्तिमत्त्व रमाईचे होते. संसारात तुझं माझं न करता आपलं म्हणून समर्पन करणारी स्त्री आजच्या प्रत्येकाने समजनु घ्यावी म्हणजे संसार वादाचा न होता संवादाचा होईल हे विशेष जाणवते.रमाईंच्या पुढे ससांराची स्वप्न होती तर बाबासाहेबांच्या डोक्यात अर्थशास्त्राची, समाजशास्त्राची मोठमोठी गणित होती . जाती संस्थेचे उच्चाटन करण्याचे चक्र होते. देशाला यातून बाहेर काढण्याचे ते मार्ग शोधत होते. रमाईची साधना संसाराची होती तर बाबासाहेबांची साधना अभ्यासाची होती. ध्येय वेड्या नवऱ्याच्या उच्च शिक्षणासाठी लाचारीच्या जगण्यापेक्षा स्वाभिमानाचे जगणारी कतृत्ववान रमाई होती.

रमाईला बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुले यांना आदर्श मानत शिक्षण दिले. बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई यांच्यात परदेशात राहिल्यानतंर होणारे पत्र संवाद हे अतिशय प्रेरणादायी आहेत. माहेरी शिक्षणाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना सासरी शिकून' बुद्धांचे चरित्र' सुभेदार रामजी आंबेडकरांना वाचनू दाखवणारी, बाबासाहेबांना पत्र लिहिणारी, त्या पत्रातनू त्यांना सतत प्रेरणा देणारी रमाई भावते.तिच्यात होणारे असेबदल पाहून प्रत्येक स्त्रीला आपणही ठरवलं तर जिद्दीने अशक्य ती गोष्ट शक्य करू शकतो हा आत्मविश्वास आजही येतो . बाबासाहेब आंबेडकर रमाईला लिहिलेल्या पत्रामध्ये म्हणतात, "मी स्त्री मुक्तीसाठी व उन्नतीसाठी लढणारा एक योद्धा आहे.स्त्रियांची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी आवश्यक जो सघंर्ष केला त्याचा मला सार्थ अभिमान आहे."यावरून डॉ. आंबेडकरांची स्त्री विषयक भूमिका स्पष्ट होती आणि रमाईला सांगितल्यामुळे रमाईची सुद्धा तितकीच वैचारिक समज होती, हेही यातनू सिद्ध होते.



स्त्री प्रश्नांकडे दोघे किती महत्त्व देऊन पाहतात हे सुद्धा समजते. कोलबिंया विद्यापीठात प्रवेश मिळाल्यानंतर रमाईला लिहि लेल्या पत्रात, " मी वणव्यातनू धावण्याची प्रतिज्ञा केली आहे. शर्यतीत जिंकलो तर देशाला उजेड्यात उभा करेन, गुलामीची कंबर बांधील. या लढाईत रमाई मला तुझी साथ हवी आहे. येथेअस्पृश्यता नावालाही नाही त्यामुळे माझ्यात एक नवी शक्ती संचार करीत आहे. या शक्तीचं रूपांतर वादळात होईल त्या वादळाच्या पाठीशी तुला उभं राहायच"या संवादातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर साथ मागत आहेत. त्याचबरोबर रमाईला तितकीच ताकदीची समज असलेली स्त्री, सहचारिणी होती म्हणून ते तिला हे बोलत आहेत. रमाई डाॅ.आंबेडकरांना याचे उत्तर म्हणून पत्र लिहिताना म्हणतात," आमची चिंता सोडा तुम्ही, तुमची काळजी घ्या .मी सांभाळीन सगळं .कष्टाची मला चिंता नाही. तुम्ही शिकावं , मोठं व्हावं, ही कामना आहे. आपण पत्रात खपू गोष्टी लिहिल्यात मी तुमच्या पाठीशी राहील. वाटेल ते कष्ट करीन मागे हटणार नाही. तुमची काळजी फार वाटते. जेवण वेळच्या वेळी घ्या. तब्येतीची काळजी घ्या"

या संवादी पत्र व्यवहारातून रमाई अतिशय आत्मविश्वासानी मी सर्व सांभाळेल म्हणत इथपासनू आंबेडकरांच्या सर्व गोष्टींना पाठिंबा देणारी धाडसी रमाई समोर येते.त्याचबरोबर सर्वसामान्य स्त्रीसारखे आपल्या नवऱ्याची तिला वाटणारी काळजी सुद्धा निदर्शनास येते. खंबीर साथी सोबत हळवा कोपरा सुद्धा समोर येतो. रमाईच्या आयुष्यात स्वतःची पोटची लेकरं गमावण्याचे दु:खद प्रसगं आले. त्याला तीने अत्यतं धीराने तोंड दिले.

स्वतःचा मुलगा रमेश गेला, याचे पत्र त्यांनी डॉ. आंबेडकरांना लिहिले होते. त्यामध्ये त्या लिहितात," रमेश आपल्याला सोडून गेला त्याच्या आजाराचे मुद्दाम कळवलं नव्हतं. तुमच्या अभ्यासात गुंतलेल्या मनाला झळ पोहोचू नये म्हणनू पण तुम्हाला एवढीच विनंती आहे हे दु:ख तुम्ही माझ्यावर सोपवा. तुमच्या अभ्यासात अडथळा येऊ देऊ नका. जेवणाचं आभाळ होऊ देऊ नका. तब्येतीची काळजी घ्या मी इकडे सार सांभाळते.ताकदीनं स्त्री असून व्यवस्थेला नाकारून एकटीने संसार पेलण्याची ताकद रमाई मध्ये होती. स्वतःचं पोटचं लेकरू गेल्यानतंर नवऱ्याला धीर देणारी हीच ती माऊली किती सयंमी, दुरदृष्टी ठेवणारी असेल याची कल्पना येते अन् अंगावर काटे येतात.


या अतिशय संवेदनशील पत्राला बाबासाहेब आंबेडकर एका ओळीत उत्तर लिहितात "बाळा तुझ्या या बापाला न भेटताच गेलास का रे!" स्वतःच्या संसारावर वेळप्रसंगी तुळशीपत्र ठेवून समाजाभिमुख ध्येय ठेवून जगणाऱ्या जोडप्याच्या आयुष्यात किती सुख दु:खाच्या प्रसंगाला मन घट्ट करून सामोरे जावे लागत असेल याची आपल्याला कल्पना येते.आपल्या पुतण्या गंगाधरच्या आजारपणात रमाईने जड अंतकरणाने डॉ. आंबेडकरांना पत्र लिहिलं होते. ते पत्र मिळताच त्यांनी लगेच रमाईला उत्तर लिहिलं ," गंगाधर विषयी ऐकून वाईट वाटलं . तुझा अभ्यास चालला आहे ही फार आनंदाची गोष्ट आहे. मी अन्नास मोताद झालो आहे तेव्हा माझ्याजवळ पाठविण्यास काही नाही तरीपण तुमचा बंदोबस्त मी करीत आहे.

वेळ जर लागला तर तुझे पैसे जर सपंले तर दागिने मोडून घे. मी आल्यावर तुझे दागिने तुला करून देईल."हे पत्र वाचताच रमाईच्या अंगावर थरकाप उडाला " मी अन्नास मोताद झालो आहे" या एका वाक्याने रमाईचा जीव कासावीस झाला. तिला वाटले की त्यांच्यासमोर व्यथा मांडायला नको होत्या. त्यांचे लक्ष विचलित होईल,अभ्यासावर परिणाम होईल अशा अनेक कारणाने रमाई स्वतःलाच दोषी मानायला लागल्या.दिवस-रात्र कष्ट करुन तोळा मासाच्या शरीराला झिजवनु आपला नवरा उपाशी आहे. या भावनेने त्यांनी 13 रुपये जमा केले आणि ते बाबासाहेबांना पाठवले. तेव्हा त्यांना समाधान मिळाले. या संवेदनशील प्रसंगातून जोडीदार म्हणून एकमेकांच्या प्रती असणारे समर्पण ,पाठिंबा , समजंसपणा, त्याग, समविचारी सुसंवादी असणारी चर्चा खपू महत्त्वाची आहे. हे प्रकर्षाने जाणवते.

उच्च शिक्षण असणाऱ्या नवऱ्याच्या बायकोच्या गळ्यात फुटका मणी नाही म्हणनू टोमणे देणाऱ्या समाज व्यवस्थेला चपराक देत माझा दागिना म्हणजे माझा नवरा, त्याचे उच्च शि क्षण, त्याचे ध्येय म्हणत अनेक टोमणे अपमानाचे प्रसगं पचवणारी रमाई आहे. सर्व सामान्य स्त्री सारखी भौतिक सुखात न रमणारी रमाई. मुंबईच्या जेजे हॉस्पिटलच्या आवारात परखडपणे भाषण करणारी निर्भिड सुद्धा पाहताना भावते.पती-पत्नी या नात्यात शिक्षण, पैसा, रंग, रुप, जात अशा मिथकांना महत्व न देता मनाचा सौंदर्य ओळखनू संसार करणारे हेआदर्श दाम्पत्य आहे. महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहावेळी रमाईची तब्येत खराब होती. तरीसुद्धा रमाई सत्याग्रहात येऊन स्वयपांक करून महिला लोकांना जेवू घालण्याची जबाबदारी मी घेते असं बाबासाहेब आंबेडकरांना म्हणत होत्या. तब्येतीमुळे आंदोलनासाठी सोबत तयार झालेल्या रमाईंना टाळून बाबासाहेब आंबेडकर कार्यालयातून परस्पर महाडला निघून गेले म्हणनू रमाई सत्याग्रहात येऊ शकल्या नाहीत.

आपल्या नवऱ्याचे आंदोलने, सभा ,संलेलन यातून बोलणं ऐकून "दारूरुपी विषारी नागा विषयी लोकांना सांगा म्हणजे लोकांचे संसार सुखाचे होतील "असा आग्रह धरणाऱ्या रमाई निर्व्यसनी समाजाचा हट्ट धरणाऱ्या होत्या. यातूनच बाबासाहेब आंबेडकरांना त्यावेळी त्यांचा प्रचंड अभिमान वाटलारमाईंकडून प्रेरणा घेऊन पुढच्या सभेचा विषय दारूबंदीचा बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला होता. त्यामध्ये बाबासाहेब म्हणाले," दारू सोडा संसार जोडा" रमाईंना आपल्या नवऱ्याबद्दल प्रचडं अभिमान वाटत होता. या प्रसंगातून रमाई आणि बाबासाहेब आंबेडकर समाजातील ज्वलतं विषयांवर सुद्धा तितकीच समर्पक चर्चा करत होते आणि त्या प्रश्नांना मार्ग काढत होते हे सिद्ध होतं.अशा रमाई प्रत्येक स्त्रीमध्येआहे. रमाईंच्या पावलावर पाऊल ठेवनू जगण्याचा आपापल्या परीने प्रयत्न करणाऱ्या अनेक स्त्रिया आपल्याला समाजात वावरताना दिसता.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने