लादेन, जवाहिरीनंतर अल-कायदाला मिळाला नवा प्रमुख; जाणून घ्या खतरनाक दहशतवादी कोण आहे?

इजिप्त: ओसामा बिन लादेननंतर अयमान अल-जवाहिरी  आणि आता अल-कायदाला नवा प्रमुख मिळालाय.जवाहिरीच्या मृत्यूनंतर इजिप्तच्या सैफ-अल-अदलला  दहशतवादी संघटनेची कमान मिळाल्याचं वृत्त आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं याबाबत माहिती दिलीये.गेल्या वर्षी अमेरिकेनं केलेल्या हवाई हल्ल्यात जवाहिरी मारला गेला होता. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, 'अल कायदाचा नवा नेता सैफ अल-अदल इराणमध्ये असून यापूर्वी यूएनकडून एक अहवालही जारी करण्यात आला होता. यामध्ये अदल आता संघटनेचा नवा नेता असल्याचं म्हटलं होतं. यापूर्वी 2011 मध्ये लादेनचा पाकिस्तानमधील अबोटाबादमध्ये मृत्यू झाला होता.'



कोण आहे सैफ अल-अदल?

62 वर्षीय सैफ इजिप्शियन स्पेशल फोर्समध्ये लेफ्टनंट कर्नल होता. अदलनं दहशतवादी संघटनेची ताकद वाढवण्यास मदत केली. तसंच, 11 सप्टेंबर 2001 च्या हल्ल्यात त्यानं काही अपहरणकर्त्यांना प्रशिक्षणही दिलं होतं, असं सांगण्यात येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अदल 2002 किंवा 2003 पासून इराणमध्ये आहे. तो अनेकवेळा पाकिस्तानातही गेला असल्याचं बोललं जात आहे. मात्र, आजतागायत संघटनेनं अधिकृतपणे अदलला प्रमुख म्हणून घोषित केलेलं नाही.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने