नरेंद्र मोदी स्टेडियमवर सचिनच्या हस्ते विश्वविजेत्या कन्यांचा सत्कार

नवी दिल्ली : शेफाली वर्माच्या नेतृत्वात भारताच्या १९ वर्षांखालील महिला संघाने रविवारी इंग्लंडच्या महिला संघावर सात विकेट राखून मात करीत पहिल्यावहिल्या १९ वर्षांखालील विश्‍वकरंडकाच्या जेतेपदावर मोहोर उमटवली. भारतीय महिला क्रिकेट संघाचे हे कोणत्याही (एकदिवसीय, टी-२० व १९ वर्षांखालील) क्रिकेटच्या प्रकारातील हे पहिलेच जेतेपद ठरले हे विशेष. आता या विश्‍वविजेत्या भारतीय संघातील खेळाडूंचा गौरव भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये उद्या (ता. १) हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.



याआधी भारतीय महिला क्रिकेट संघांना आयसीसीकडून आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठेच्या स्पर्धांचे जेतेपद पटकावता आले नव्हते. भारताचा वरिष्ठ महिला संघ एकदिवसीय व टी-२० क्रिकेट विश्‍वकरंडकापासून आतापर्यंत दूरच राहिला आहे. त्यामुळे भारताच्या १९ वर्षांखालील महिला संघाचे हे यश उल्लेखनीय ठरले आहे. या स्पर्धेमध्ये भारताच्या श्‍वेता सेहरावत हिने सर्वाधिक २९७ धावांचा पाऊस पाडला. तसेच पार्श्ववी चोप्रा हिने सर्वाधिक ११ विकेट घेतले. या विश्‍वविजेतेपदानंतर भारताच्या युवा संघावर चोहोबाजूंनी कौतुकांचा वर्षाव होत आहे.

तिसऱ्या लढतीआधी सत्कार भारत - न्यूझीलंड यांच्यामध्ये उद्या तिसरी टी२० लढत रंगणार आहे. पुरुषांची ही लढत संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार असून त्याआधी संध्याकाळी ६.३० वाजता विश्‍वविजेत्यांचा सत्कार सोहळा पार पडणार आहे.''मला हे सांगताना आनंद होत आहे की, भारतरत्न सचिन तेंडुलकर व बीसीसीआय यांच्या वतीने विश्‍वविजेत्या १९ वर्षांखालील भारतीय संघाचा सत्कार १ फेब्रुवारी रोजी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात येणार आहे. भारताच्या युवा महिलांनी भारताचा झेंडा आंतरराष्ट्रीय स्तरावर दिमाखात फडकवला. आता त्यांच्या या संस्मरणीय कामगिरीचा सन्मान करण्यात येणार आहे.''

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने