विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेण्यास प्राधान्य

 कोल्हापूर : ‘‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची शाखा राज्यभरातील प्रत्येक महाविद्यालयाबाहेर काढण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रश्न, अपेक्षा जाणून घेणे व पक्षवाढीसंदर्भात विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी येथे आलो आहे,’’ असे मत महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी आजपत्रकारांशी अनौपचारीकरित्या बोलताना सांगितले. राजकीय घटना-घडामोडींवर भाष्य करण्यासाठी येथे आलेलो नाही, तर विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेण्याला माझे प्राधान्य असेल, असेही ठाकरे यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले.

ते म्हणाले, ‘‘शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एसटी बस नियमित येत नाही. रॅगिंग किंवा मुली पळून जाणे अशा समस्या विद्यार्थ्यांनी सांगितल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या अपेक्षा मी नोंदवून घेणार आहे, त्याचा अहवाल बनवून पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे देणार आहे. राज्यभरात विद्यार्थी सेनेची शाखा स्थापन करीत आहे.मुंबईत १५०, तर पुणे, ठाणे व मराठवाड्यात विद्यार्थी सेनेच्या शाखा स्थापन झाल्या आहेत. उत्तर महाराष्ट्रासह अन्य जिल्ह्यांत हे काम सुरू आहे. विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षांचे प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न, परीक्षांतील त्रुटीचे विषय असे अनेक प्रत्येक महाविद्यालयाचे प्रश्न वेगवेगळे आहेत. ते सोडविण्यासाठी मनसे विद्यार्थी सेनेच्या शाखा काम करतील.’’







श्री अंबाबाई देवीचे घेतले दर्शन

दरम्यान, ठाकरे यांनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. यानंतर राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी भेट दिली. सकाळी न्यू कॉलेज, विवेकानंद महाविद्यालयात त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा मेळावा उद्यमनगरातील कोल्हापूर इंजिनियरिंग असोसिएसनच्या हॉलमध्ये घेतला. यातही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, सामाजिक, व्यक्तिगत प्रश्नही समजून घेतले.

‘हे सत्ताधाऱ्यांना कळू देत’

सातवीनंतर मुलींचे शिक्षण बंद केले जातेय, हा गंभीर विषय आहे. मुली पळवून नेल्या जात आहेत. एखाद्या शहराचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही, अशा प्रतिक्रिया आल्या आहेत. असे विषय गांभीर्याने घ्यावे लागतील. यावर वेळीच काम केले नाही, तर मते मिळणार नाहीत, हे एकदा सत्ताधाऱ्यांना कळू देत, असेही ठाकरे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने