'तेजस' ठरतंय आकर्षणाचे केंद्र

बंगळूर:  यलहांका येथे सुरू असलेल्या एरो इंडियामध्ये विविध प्रकारची दालने असून यात असलेल्या इंडियन पव्हेलीयनमध्ये 'मेक इन इंडिया'ची अनुभूती होत आहे. तर या दालनात प्रदर्शित करण्यात आलेल्या भारतीय बनावटीचे हलके लढाऊ विमान 'तेजस' हे सगळ्यांच्याच आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे.गेल्या काही वर्षांमध्ये देशात आत्मनिर्भर भारत संकल्पाने अंतर्गत स्वदेशी उत्पादनांच्या निर्मितीवर भर दिला जात आहे. संरक्षण क्षेत्रात यासाठी वेगाने वाटचाल सुरू असून आधुनिक शस्त्रास्त्रे, विमाने, तंत्रज्ञान व प्रणालींची निर्मितीत संरक्षण क्षेत्राबरोबरच देशातील खासगी उद्योग, स्टार्टअप यांचा सहभाग वाढत आहे. त्यातील अनेक उत्पादने या इंडीयन पव्हेलीयनमध्ये प्रदर्शित करण्यात आली आहेत.

तसेच लष्करातील अधिकाऱ्यांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञान आणि उपकरणांचा समावेश आहे. यामध्ये विमानांचे भाग, विमानांच्या लहान प्रतिकृती, सिम्युलेटर, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपकरणे, इस्रोचे उपकरणे, ड्रोन यांसह अनेक गोष्टी मांडण्यात आल्या आहेत. इंडीयन पव्हेलीयनच्या मधोमध आहे ते हिन्दुस्तान एरोनॉटिकल लिमिटेडद्वारे (एचएएल) निर्मित हलके लढाऊ विमान 'तेजस'. आपल्या खऱ्या खुऱ्या आकारातील हे विमान परदेशी पाहुण्यांना ही भारताची क्षमता पटवून देत आहे.'मेक इन इंडिया काय आहे, आणि ते कोणत्या दिशेने वाटचाल करत आहे याची जाणीव इंडीयन पव्हेलीयनमध्ये झाली आहे. त्यात या संपूर्ण पव्हेलीयनमध्ये आल्यावर वेगळीच ऊर्जा जाणवली. प्रत्यक्षात तेजस विमान पाहण्याची संधी मिळाली ती ही जवळून. आम्ही नेहमी हा कार्यक्रम पाहायला येतो, यंदा बऱ्याच वेगळ्या गोष्टींची अनुभूती झाली. त्यात अमेरिकेचे एफ ३५ आणि बी-१बी लांसर सुपरसोनिक बाॅम्बर जेट पण पाहायला मिळाले.'




अर्जेंटिना आणि इजप्तने दिली 'तेजस'साठीची ऑर्डर -

एरो इंडियामध्ये विविध देशाचे संरक्षण मंत्री, सशस्त्र दल प्रमुख आणि अधिकाऱ्यांनी आपली उपस्थिती नोंदवली आहे. त्यात भारतीय बनावटीच्या 'तेजस' विमानाच्या क्षमतेची चर्चा होत असताना काही देशांनी या हलक्या लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी एचएएला ऑर्डर देण्यासाठी चर्चा केली आहे.याबाबत एचएएलच्या एआरडीसीचे वरिष्ठ व्यवस्थापक सुब्रामणी यांनी सांगितले, 'अर्जेंटिना आणि इजप्त या दोन देशांनी तेजस या विमानाची मागणी केली आहे. तसेच सिंगापूर, मलेशिया या देशांशी ही याबाबत चर्चा होणार आहे.भारतीय हवाई दलाबाबत सांगायचे झाले तर, त्यांच्यासोबत सुमारे ८० एलसीए 'तेजस'साठी करार करण्यात आले होते. आला तसेच ३६ मार्क १ ए आवृत्तीचे आणखीन ३६ विमाने पुरवली जातील. तर आता मार्क २ तेजस या अवृत्तीवर काम सुरू असून त्याबाबत ही हवाईदलासोबत चर्चा सुरू आहे. आधुनिक क्षेपणास्त्रे आणि तंत्रज्ञानानुसार या विमानात अपग्रेडेशन केले जातील. आतापर्यंत सुमारे ३५ विमाने हवाई दलाला देण्यात आले असून अजून ३० ते ४० विमाने दिले जाणार आहेत. यासाठी ४ ते ५ वर्षांचा कालावधी लागू शकतो.'

हवाई दल प्रमुखांनी केले उड्डाण -

१४ व्या एरो इंडियाच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक चौधरी यांनी स्वतः या स्वदेशी बनावटीच्या हलक्या लढाऊ विमान 'तेजस'चे उड्डाण करत 'गरुड फॉर्मेशन'चे नेतृत्व केले होते.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने