'पक्षपातीपणा झाला, एमसी स्टॅन कसा जिंकला? विजेता शिवच!' नेटकऱ्यांचा संताप

मुंबई: टीव्ही मनोरंजन विश्वातील सर्वात लोकप्रिय अशा बिग बॉस १६ चा अंतिम सोहळा काल पार पडला. त्यामध्ये ज्याच्याकडून विजयाच्या अपेक्षा होत्या तो उपविजयी ठरला आणि चाहत्यांमध्ये नाराजी पसरली. मराठमोळ्या शिव ठाकरेच्या विजयाकडे सगळेजण डोळे लावून बसले होते. मात्र अनपेक्षित निकालानं लाखो चाहत्यांची, नेटकऱ्यांची नाराजी लपून राहिली नाही.बिग बॉसच्या अंतिम पर्वाचा निकाल जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावर हा शो मोठ्या प्रमाणात ट्रोल झाला आहे. सोशल मीडियावर ज्या प्रतिक्रिया व्हायरल झाल्या आहेत त्यामध्ये बिग बॉसमध्ये पक्षपातीपणा झाला आहे असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.



अनेकांना या स्पर्धेच्या शेवटच्या दोन स्पर्धकांमध्ये प्रियंका चौधरी आणि शिव ठाकरे यांना पाहायचे होते. मात्र तसे काही झाले नाही. शेवटच्या दोन स्पर्धकांमध्ये शिव आणि एमसी स्टॅन हे दोघे होते. त्यांच्यात चुरस होती. अनेकांना शिव ठाकरेच विजयी होणार याची पूर्ण खात्री होती.मराठी बिग बॉसचे विजेतेपद पटकावलेल्या शिव ठाकरेकडे अनुभवाची काही कमी नव्हते. बिग बॉसमधील प्रत्येक टास्कमध्ये त्यानं भाग घेतला होता. बिग बॉसच्या घरातील त्याचे वागणेही सगळ्यांशी सहकार्यपूर्ण होते.त्यामुळे अनेकांना तो विजयी होईल असे वाटत होते. मात्र बिग बॉसचा होस्ट सलमान खाननं ट्रॉफी एमसी स्टॅनच्या हातात दिल्यावर कित्येकांना मोठा धक्काच बसला. 

आणि नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर बिग बॉसलाच धारेवर धरले.बिग बॉसच्या मेकर्सनं पक्षपातीपणा केला आहे. त्यांनी नेमक्या कोणत्या निकषावर एमसी स्टॅनला विजेता म्हणून घोषित केले हे सांगावे. बिग बॉसचा हा निकाल आम्हा सर्वांसाठी धक्कादायक आहे. कित्येकांनी तर यापुढे आम्ही हा शो पाहणं कटाक्षानं टाळणार आहोत.असेही म्हटले आहे. प्रियंकाला बाहेरचा रस्ता दाखवत एमसी स्टॅन हा अंतिम दोन स्पर्धकांच्या यादीत असेल असे तर कुणालाही वाटले नव्हते. त्यामुळेच की काय जो निकाल जाहीर झाला त्याविषयी शंका उपस्थित केली जात आहे.निकालानंतर नेटकऱ्यांनी बिग बॉसचे मेकर्स आणि एमसी स्टॅनवर आगपाखड केली आहे. केवळ तो रॅपर आहे, त्याच्या नावाभोवती मोठे ग्लॅमर आहे या कारणास्तव त्याला विजेता म्हणून जाहीर करण्यात आले की काय असा प्रश्न नेटकऱ्यांनी केला आहे. कित्येकांनी बिग बॉसच्या निर्मात्यांवर शेलक्या शब्दांत टिप्पणी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने